श्याम नाडेकर।आॅनलाईन लोकमतनागपूर : शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शेतीची मुळातच आवड. कोरडवाहू शेती न परवडणारी, त्यामुळे सिंचनाची सोय निर्माण करून संत्रा उत्पादनाकडे वळलो. पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या पद्धतीनेच वडील ओलित करायचे, त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवायला लागली. उत्पादनात घट झाली. या सर्व बाबींचा विचार करून सर्वप्रथम ठिबक सिंचन वापरून सिंचनाचे योग्य नियोजन केले. त्यातून आज २० एकर जमिनीत जवळपास २,८०० संत्राझाडांची फळबाग फुलविल्याचे खरसोली येथील सेवानिवृत्त प्राध्यापक धनराज अरसडे यांनी सांगितले. संत्राबागेतून वर्षाला सरासरी दोन लाखांचे उत्पन्न मिळते. योग्य सिंचन व मशागत केल्यास संत्रा पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले.शेतीत काम करणाऱ्या मजुरांची आज सर्वत्र वानवा आहे. त्यामुळे इतर पिकांची मशागत करताना मजुरीवर खर्च अधिक होतो. त्यामुळेच इतर पिके परवडेनाशी झाली आहे. संत्राबागेकरिता तुलनेने कमी मजूर लागतात. ठिबक सिंचनाद्वारेच झाडांना शेणखत व इतर खतांचा पुरवठा केला जातो. शेती तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेऊन मशागत केली जाते. संत्र्याकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे फवारणी, आंतरमशागत व सिंचनाची वेळ आहे. त्याचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात योग्य नियोजन केल्यास संत्रापिकाला आपल्या भागात तोड नाही, असे धनराज अरसडे सांगतात.पावसाळा उशिरा सुरू होत असल्याने मृगबहाराच्या संत्र्याचा आकार लहान राहतो, शिवाय फळांची उशिरा तोडणी केल्याने संत्राझाडे वाळण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नियोजन करून आंबियाबहाराचे पीक घेतो. याला बाजारात मागणीही मोठ्या प्रमाणात असते व भावही चांगला मिळतो. नागपूर जिल्ह्यात नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर व कळमना नागपूर येथे बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने सोयीचे असल्याचे त्यांनी सांगितले.संत्रा कलमांमध्ये शेतकऱ्यांची फसगतसद्यस्थितीत बाहेरून येणाऱ्या संत्र्याच्या कलमांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसगत होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत: तयार केलेल्या कलमांची २० एकरात लागवड केली आहे. संत्रा झाडांचे आयुष्य सरासरी २५ वर्षे आहे. सुरुवातीची पाच वर्षे योग्य नियोजन केल्यास पुढील २० वर्षे उत्पन्न सुरू होते. दरवर्षी सरासरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. कमी मशागत, जास्त उत्पन्न देणारे संत्रा पीक आहे, फक्त योग्य नियोजन व मशागत गरजेचे असल्याचे अरसडे म्हणाले.
तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावेल!संत्रा आकाराने लहान असल्यास भाव कमी मिळतो. अशा लहान संत्र्यांचा उपयोग संत्रा कारखान्यात होतो. नागपूर जिल्ह्यात विशेषत: नरखेड, काटोल परिसरात अशा प्रकारचे कारखाने सुरू झाले तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी संत्रा उत्पादनाकडे वळून त्यांची आर्थिक स्थिती नक्कीच उंचावेल, असा विश्वास धनराज अरसडे यांनी व्यक्त केला. शासनाने केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचा संत्रा उत्पादकांना फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.