नागपूर : कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मेयोच्या प्रयोगशाळेत ‘जिनोम सिक्वेंसिंग’ म्हणजे जनुकीय चाचणीला परवानगी मिळाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. ही प्राथमिक चाचणी असलीतरी ‘ओमायक्रॉन’ आहे किंवा नाही यातून कळणार आहे. आज पहिल्याच दिवशी दोन नमुने तपासण्यात आले.
देशात विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेला (व्हीआरडीएल) मंजुरी दिली. या प्रयोगशाळेत स्वाईन फ्लू, डेंग्यू, हेपेटायटीस ए, ई, बी, चिकनगुनिया, जपानी ज्वर, रोटाव्हायरस, पोलिओ व्हायरस या सारख्या महत्त्वाच्या तपासण्या होतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली तेव्हा याच प्रयोगशाळेतून विदर्भातून पहिल्यांदाच ‘आरटीपीसीआर’ला सुरुवात झाली. आता जनुकीय चाचणीतून ‘ओमायक्रॉन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंटची प्राथमिक तपासणीही याच प्रयोगशाळेतून होत आहे.
-लवकर अहवाल मिळण्याची शक्यता
'प्रत्येक व्हायरसची जनुकीय संरचना वेगळी असते. व्हायरसची जनुकीय संरचना कशी आहे याचा शोध घेणे म्हणजे 'जिनोम सिक्वेंसिंग'. ‘ओमायक्रॉन’च्या धोक्यामुळे विदेशातून आलेल्या कोरोनाबाधित प्रवाशाला ‘ओमायक्रॉन’ची बाधा तर झाली नाही ना हे तपासणीसाठी त्यांचे नमुने ‘जिनोम सिक्वेंसिंग’ साठी पुणे किंवा दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविल्या जात आहेत. परंतु येथे सर्वच ठिकाणाहूनही नमुने येत असल्याने अहवाल प्राप्त होण्यास आठवड्याभराचा कालावधी लागत आहे. यामुळे पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ने (एनआयव्ही) मेयोच्या प्रयोगशाळेला 'जिनोम सिक्वेंसिंग'साठी काही किट्स दिल्या आहेत.
- ही प्राथमिक चाचणी
मेयोच्या ‘व्हीआरडीएल’ला काही किट्स उपलब्ध झाल्या आहेत. याच्या मदतीने ‘जिनोम सिक्वेंसिंग’ करून ‘ओमायक्रॉन’ आहे किंवा नाही याची तपासणी होणार आहे. शनिवारी दोन नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ही एक प्राथमिक तपासणी आहे.
-डॉ. भावना सोनावणे, अधिष्ठाता, मेयो