नागपूर : गर्भधारणेच्या पहिल्या ८ ते १० आठवडात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण उच्चस्तरावर (हायपरग्लेसेमिया) गेल्यास २५ टक्के बालके विकृती घेऊन जन्मास येण्याची शक्यता अधिक असते. एका अभ्यासानुसार भारतीय महिलांना गर्भकालीन मधुमेह (जीडीएम) होण्याचा धोका ११ पटीने वाढतो. यामुळे गर्भधारणा झाल्यापासून मधुमेहाची चाचणी करून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे, अशी माहिती डायबेटिस इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली.
१० मार्च हा दिवस राष्ट्रीय ‘जीडीएम’ दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आहारतज्ज्ञ कविता गुप्ता उपस्थित होत्या. डॉ. गुप्ता म्हणाले, प्रत्येक ५व्या गर्भवती महिलांना गरोदरपणात मधुमेह होतो. प्रसूतीनंतर हा मधुमेह ९० टक्के अदृश्य होऊन जातो. परंतु प्रसूतीनंतरही वजन नियंत्रणात नसल्यास काही मातांना वयाच्या साधारण ४०व्या वर्षी ‘टाईप टू’ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी प्रसूतीनंतर सहाव्या दिवशी, नंतर सहा आठवड्यांनी, नंतर सहा महिन्यांनी आणि नंतर दर वर्षी एकदा मधुमेहाची चाचणी करणे आवश्यक असते.
-तरुण मुलींमध्ये ‘जीडीएम’चा धोका अधिक
बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण मुलींमध्ये ‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम' (पीसीओएस) रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हा महिलांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होतो. या मुलींना गर्भकालीन मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे तरुणपणीच लठ्ठपणा नियंत्रणात आणणे आवश्यक असते.
-तरुणांनाही होऊ शकतो मधुमेह
ज्या महिलांना गर्भकालीन मधुमेह असतो त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला तरुण वयात मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोकाही असतो. गर्भकालीन मधुमेह असलेल्या ५० टक्के महिलांना प्रसूतीनंतर ५ ते १० वर्षांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता असते. यामुळे प्रसूतीनंतरही मधुमेहाची चाचणी करत राहणे गरजेचे ठरते.
-७० टक्के गर्भकालीन मधुमेहावर औषधांची गरज नसते
सुदैवाने ७० टक्के गर्भकालीन मधुमेहावर औषधांची गरज नसते. केवळ आहार थेरपीद्वारे मधुमेह नियंत्रित करता येतो. म्हणूनच शासनाने प्रत्येक गर्भवती महिलांची मधुमेह चाचणी करण्याचा सूचना दिल्या आहेत. केवळ एका ग्लुकोज चॅलेंज टेस्ट (जीएसटी) मधुमेहाचे निदान केले जाऊ शकते. या चाचणीमुळे मातेचा आणि बाळाचा जीव वाचू शकतो.