नागपूर : लसीकरणासंदर्भात ग्रामीण भागात असलेल्या चुकीचे संभ्रम दूर करून, जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी संपूर्ण ग्रामपंचायतीला केले. १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू होणार आहे. ज्या ग्रामपंचायती लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट प्रथम पूर्ण करेल, अशा तीन ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून पुरस्कार देण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वाढता प्रसार बघता, लसीकरणाच्या बाबतीत काही चुकीचे गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोरोना संक्रमण टाळता येऊ शकते, असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला. येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होणार आहे. याबाबत त्यांनी आढावा घेतला. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनासंबंधित साहित्य कमी पडत असतील, त्यांना तात्काळ साहित्य पुरविण्यात यावे, असे आरोग्य अधिकाऱ्यांना आदेशित केले. जिल्ह्यातील कोरोनाचे नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा व साधनांसाठी जिल्हा परिषदेने शासनाला ५७ कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर केला आहे. या बैठकीला अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, मनोहर कुंंभारे, दुधाराम सव्वालाखे, समीर उमप, कैलास बरबटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार आदी उपस्थित होते.