नागपूर : गुलाबी बोंडअळीचा कापसावरील प्रकोप टाळण्यासाठी हे पीक शेतातून काढून टाका, फरदड घेऊ नका, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अळीची शृंखला तोडण्यासाठी आणि पुढील वर्षीचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने हे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांचा यंदा फक्त दोन वेळेचाच कापसाचा वेचा झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटून आहे. मात्र याचदरम्यान चिवटा रोगही पडला आहे. मागील काही दिवसांपासून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरूच आहे. यामुळे वेचा करणे जिकरीचे झाले आहे. कृषी विभागाने डिसेंबर-जानेवारी दरम्यान कापसाचे पीक पूर्णपणे काढून टाकण्याचे व नंतर खोडवा (फरदड) न घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. फरदडचा कापूस साधारणत: ३० टक्के उत्पन्न देतो. मात्र बोंडअळीच्या नियोजनासाठी या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.
...
कापूस वेचणी झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी पऱ्हाट्या आणि इतर पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. कापूस मिल व व्यापारसंकुल, कापसाचा व्यापार व साठवणूक होत असणाऱ्या ठिकाणी प्रकाश व कामगंध सापळे लावून त्यात अडकलेले पतंग वेळोवेळी नष्ट करावेत. खबरदारी घेऊन फवारणी करावी.
- प्रज्ञा गोळघाटे, विभागीय कृषी सहसंचालक
...
हरभरा घाटेअळीचे असे करा नियोजन
नागपूर विभागात हरभरा पिकांखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. या पिकावर घाटेअळींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सुरुवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्काने फवारणी करावी. तसेच हरभऱ्याच्या शेतात पक्षी थांबू शकतील असे थांबे उभारावेत, जेणेकरून पिकावरील घाटेअळी नष्ट करण्यास आणि पक्ष्यांना अन्न मिळण्यास मदत होईल. घाटेअळीचे प्रमाण वाढल्यास फ्लूबेंडामाइड, क्विनॉलफॉस, टायझोफॉस, डेल्टामेथ्रीनची दोन वेळा फवारणी करावी.
...