महापौरांद्वारे गठित समितीचा निर्णय : उपायुक्तांच्या उपस्थितीत होणार झोनमध्ये बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपन्यांच्या कार्यप्रणालीबाबत झोनल अधिकाऱ्यांपाठोपाठ झोन सभापती व सहायक आयुक्तांचे मत मागण्यात आले. झोनल अधिकारी आणि सहायक आयुक्त यांच्या मतांमध्ये विसंगती असल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या कार्यप्रणालीची आणखी चौकशी आवश्यक असल्याने यात नगरसेवकांचे अभिप्राय घ्यावेत असे निर्देश सत्तापक्ष नेते तथा समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले.
एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीच्या कामामध्ये त्रुटी आढळल्यास त्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याद्वारे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समिती गठित केली. या समितीची शुक्रवारी मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, सदस्य उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, झोन सभापती पल्लवी श्यामकुळे, सुनील हिरणवार, कल्पना कुंभलकर, वंदना भगत, स्नेहल बिहारे, श्रद्धा पाठक, अभिरुची राजगिरे, मनिषा अतकरे, वंदना चांदेकर, प्रमिला मंथरानी, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त, दहाही झोनल अधिकारी आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
...
सहायक आयुक्तांचे मत बदलले
प्रारंभी दोन्ही कंपन्यांद्वारे आणि झोनमार्फत सादर करण्यात आलेल्या कंपन्यांचे कर्मचारी, वाहन आदींच्या माहितीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये काही झोनमध्ये कंपनी आणि झोनद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून आली. पुढे कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल झोनच्या सहायक आयुक्तांचे अभिप्राय घेण्यात आले. यामध्ये सहायक आयुक्तांनी कंपन्यांच्या कामाबाबत समाधानी नसल्याचे मत मांडले तर आधीच्या बैठकीमध्ये झोनल अधिकाऱ्यांनी शंभर टक्के समाधानी असल्याचे मत मांडले होते. विसंगीमुळे चौकशी पुढे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
....
नगरसेवकांचे अभिप्राय नोंदवा
सात दिवसामध्ये झोन स्तरावर उपायुक्त राजेश भगत यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांचे लेखी तसेच मौखिक अभिप्राय घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. माजी महापौर व प्रवीण दटके व विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी पत्र देऊन समिती पुढे आपले मत मांडण्यासाठी वेळ मागितल्याचे ठाकरे यांनी सांगितले.