लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांमध्ये जखमी होऊन ‘ब्रेनडेड’ होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशास्थितीत वाहन परवान्यामध्येच अवयवदानाविषयी संबंधित व्यक्ती इच्छुक आहे किंवा नाही, याविषयी माहिती असल्यास अवयव प्रत्यारोपणाला मदत मिळू शकेल. याच दृष्टीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी परवान्यात तशी नोंद घेण्याची संकल्पना मांडली. याला घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर शहरने घेतली. परवान्याचा आॅनलाईन अर्ज भरताना अवयवदानासाठी इच्छुक आहात किंवा नाही, हा पर्याय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांना पाठविला. राज्य परिवहन विभागाने २०१३ मध्ये नवीन वाहन परवाना काढताना उमेदवाराला ‘आरटीओ’ कार्यालयात अवयवदानाची शपथ देण्याचे व अवयवदान करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून तसा अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते.याची सुरुवात मुंबईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) होऊन सर्व कार्यालयांमध्ये सुरू झाली. परंतु अर्ज भरण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू होताच ही मोहिमच बंद पडली. दरम्यानच्या काळात आरटीओचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी व उमेदवारांच्या सोयीसाठी राज्यभरात शिकाऊ व पक्क्या वाहन परवान्यासाठी आनॅलाईन अर्ज भरून ‘अपॉर्इंटमेंट’ घेण्याची योजना २०१४ पासून सक्तीची केली. या अर्जातच अवयवदानाचे शपथपत्र दिले आहे. यात अर्जदाराची इच्छा असेल तर ‘टीक’ करावे, अशी सूचना आहे. ‘टीक’ नाही केले तरी अर्जदाराला समोर जाता येते. यामुळे बहुसंख्य उमेदवार याकडे पाहतसुद्धा नाही. परिवहन विभागाकडे किती जणांनी आपली इच्छा व्यक्त केली, याचीही नोंद नाही. परिणामी, परिवहन विभागाची अवयवदानाची मोहीम मागे पडली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने ‘गडकरींचे स्वप्न कसे पूर्ण होणार’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची दखल नागपूर आरटीओने घेतली.
सारथी ४.० मध्ये सुधारणा करण्याचा दिला प्रस्तावशहर आरटीओ कार्यालयाने अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सारथी ४.०’ या संकेत स्थळावर आवश्यक ते बदल करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांना पाठविला. यात परवान्याचा अर्ज भरताना अवयवदानाविषयी इच्छुक आहात किंवा नाही, असे पर्याय देऊन त्यावर ‘क्लिक’ केल्याशिवाय अर्जदाराला समोर जाता येणार नाही, अशी व्यवस्था करण्याची व परवान्यावर तशी नोंद घेण्यात यावी, असेही म्हटले आहे.