लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाही होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक जण घराबाहेर फिरत आहेत. कोरोनाबाधितांच्या अशा बेजबाबदार वागण्याला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने होम आयसोलेशनमध्ये असताना घराबाहेर फिरणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला ५ हजार रुपयाचा दंड ठोठावला.
होम आयसोलेशनमध्ये असूनही घराबाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, त्यांना दंड आकारून विलगीकरण केंद्रात पाठविण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार मनपाचे पथक सक्रिय झाले आहे. आशीनगर झोनअंतर्गत महेंद्रनगरमध्ये राहणारा एक रुग्ण घराचा बाहेर फिरताना आढळून आल्याने त्याला दंड आकारण्यात आला.
होम क्वारंटाईनचे शिक्के मारले जात नाही
बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटण्यासाठी त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन असल्याबाबतचे शिक्के मारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. परंतु या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने होम क्वारंटाईन असलेले सर्वत्र भटकत आहेत. त्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यापासून संक्रमण होण्याचा धोका आहे.
लक्षणे नसली तरी खबरदारी आवश्यक
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग करून त्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र लक्षणे दिसत नसल्याने बाधितांच्या संपर्कात आलेले नागरिक कोरोना चाचणी करण्याचे टाळतात. परंतु लक्षणे दिसत नसली तरी अशा नागरिकांकडून संक्रमणाचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.