नागपूर : धावत्या रेल्वेगाडीत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे दोन्ही पाय कटल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. लगेच तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी ९.१० वाजता घडली.
पुष्पमाला सुधाकर ओटे (५२) असे मृत महिलेचे नाव आहे. ती सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. तिला नागपूरवरून पांढुर्णा येथे जायचे होते. तेवढ्यात ०२७२१ हैदराबाद-निजामुद्दीन विशेष रेल्वेगाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक १ वर आली. या महिलेला डी-१ या कोचमध्ये बसायचे होते. त्यामुळे गाडी थांबण्यापूर्वीच ही महिला कोचमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होती. या प्रयत्नात तिचा तोल जाऊन ती रेल्वेगाडी आणि प्लॅटफाॅर्मच्या मध्ये असलेल्या जागेत पडली. यात तिचे दोन्ही पाय मांडीपासून कटले. पाय कटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तेवढ्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बूटपॉलिश करणारे हिरालाल कमधरे, राजीन मोहरे यांनी या महिलेस बाहेर काढले. याची सूचना उपस्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वे रुग्णालयाला दिली. रुग्णवाहिकेतून या महिलेस उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
..............