लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोतवालीच्या शिवनगरात राहणाऱ्या श्रीराम क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाच्या घराला संतप्त गुंतवणूकदारांनी शनिवारी रात्री घेराव घातला. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या भागात तणाव निर्माण झाला होता.सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांनी गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ही संस्था आर्थिक कोंडीत सापडली असून, गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम नियोजित अवधी संपूनही मिळालेली नाही. परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रारही झाली आहे. मात्र, पोलिसांकडून फरार मेहरकुरेला शोधण्यासाठी विशेष असे प्रयत्न होत नसल्याने गुंतवणूकदारांच्या रोषात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर, मेहरकुरेच्या घरी आज रात्री संशयास्पद धावपळ दिसल्याने गुंतवणूकदारांनी एकमेकांना फोन करून घरासमोर जमणे सुरू केले. रात्री ११.३० च्या सुमारास मेहरकुरेच्या घरासमोर सुमारे १५० ते २०० गुंतवणूकदार जमले. त्यामुळे मेहरकुरेच्या कुटुंबीयांनी आतमधून कुलूप लावून पोलिसांना फोन करून घरावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली. त्यानुसार, कोतवालीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. गुंतवणूकदार केवळ मेहरकुरेच्या घराला घेराव घालून असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गुंतवणूकदारांचा पोलिसांवरही रोष आहे. त्यामुळे पोलिसांनी शांतपणे त्यांना तेथून निघून जाण्याची विनंती केली. गुंतवणूकदारांनी पोलिसांना दाद दिली नाही. मेहरकुरेंच्या कुटुंबीयांना नागपुरातून पळून जाण्यासाठी पोलीस मदत करीत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे काहींनी घोषणाबाजीही केली. परिणामी वृत्त लिहिस्तोवर तेथे तणावाचे वातावरण होते.
नागपुरात श्रीराम क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाच्या घराला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:44 AM
कोतवालीच्या शिवनगरात राहणाऱ्या श्रीराम क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाच्या घराला संतप्त गुंतवणूकदारांनी शनिवारी रात्री घेराव घातला. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या भागात तणाव निर्माण झाला होता.
ठळक मुद्देतणावाचे वातावरण