लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राष्ट्रवादीला राज्यात ‘मेगागळती’ लागली आहे. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला आहे. हिंगण्याचे भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून, त्यांना येथे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. घोडमारे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मंगळवारी नागपुरात शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विदर्भात आहेत. घोडमारे यांनी पाटील यांची मंगळवारी नागपुरात भेट घेतली. या भेटीत घोडमारे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. माजी मंत्री रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय सेलचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यावेळी उपस्थित होते.घोडमारे यांनी आजच्या भेटीबाबत दुजोरा दिला असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले. माजी मंत्री रमेश बंग हिंगणा मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करीत आले आहे. गत दोन निवडणुकीत त्यांचा येथे पराभव झाला. त्यामुळे यावेळी ते येथून लढतील की नाही, हे अस्पष्ट आहे. बंग यांच्याऐवजी नरवाडे यांच्या नावाची राष्ट्रवादीत चर्चा होती. काही दिवसांपूर्वी हिंगणा येथे झालेल्या बैठकीत समर्थकांनी बंग यांना पुन्हा लढण्याची विनंती केली होती. त्यामुळे नरवाडे यांचे नाव मागे पडले. आता घोडमारे, बंग आणि नरवाडे यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगण्यात घोडमारे राष्ट्रवादीचे उमेदवार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:32 AM