योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परत एकदा बनावट पदवी आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन आरोपी ट्रान्सक्रिप्ट तयार करण्यासाठी बनावट पदवी घेऊन विद्यापीठात पोहोचले होते. दस्तावेज साक्षांकित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान परीक्षा विभागाच्या संचालकांना ही बाब लक्षात आली व या प्रकाराचा भंडाफोड झाला. आंध्रप्रदेशातील एका आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकारामुळे बनावट पदवीचा विषय परत एकदा चर्चेला आला असून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणात रमनकुमार सितारामुलू बंगारू (४०, पुतूरवारी, तोटामार्ग, पाचवी लाईन, गुंटूर), रतनबाबू आनंदरावमेकातोटी (४०, नल्लापाडू) व कांचरला रोशन कांचरला कोटेश्वरराव अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास रमनकुमार व रतनबाबू हे विद्यापीठाच्या परीक्षा भवनात पोहोचले. ते कांचरला रोशन या बॅचलर ऑफ इंजिनिअर पदवीप्राप्त विद्यार्थ्याच्या ८ ट्रान्सक्रिप्ट, १ कन्सोलेडेट ट्रान्सक्रिप्ट व पदवीच्या साक्षांकनासाठी आले होते. विद्यापीठातील अब्दुल सईद अब्दुल सत्तार हे कर्मचारी संबंधित प्रक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्या कक्षात पडताळणीसाी गेले. एका दस्तावेजावर विद्यापीठाचा गोल शिक्का व तत्कालिन कुलगुरुंची स्वाक्षरी होती.
डॉ.साबळे यांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता नागपूर विद्यापीठाने जारी केलेल्या रेकॉर्डवर त्याची कुठलीच नोंद नसल्याची बाब समोर आली. त्यावरील कुलगुरूंची स्वाक्षरीदेखील बनावट होती. डॉ.साबळे यांनी दोघांनाही आतमध्ये बोलविले व विचारणा केली. आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉ.साबळे यांनी लगेच अंबाझरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. यादरम्यान रतनबाबू तेथून फरार झाला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी रमनकुमारला अंबाझरी पोलीस ठाण्यातील पथकाच्या हवाली केले. डॉ.साबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३३९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.