उत्तर देण्यास सरकार पक्षाने मागितला अवधी नागपूर : ठकबाज वासनकर कुटुंबाला मदत केल्याप्रकरणी कारागृहात असलेले ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी सरकार पक्षाने एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाला सोमवारपर्यंत अवधी मागितल्याने भुते यांचे कारागृहातील वास्तव्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात वासनकर यांची ९ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम आढळून आली होती. ही रक्कम तपास यंत्रणेला जप्त करता येऊ नये, म्हणून भुते यांनी वासनकर यांना अवैधरीत्या मदत करण्याच्या हेतूने बनावट दस्तऐवज तयार करून न्यायालय, तपास यंत्रणा आणि सरकारची फसवणूक केली, अशा आरोपावरून त्यांच्याविरुद्ध भांदविच्या १०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ४ जानेवारी रोजी आर्थिक पथकाने भुते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले होते. बचाव पक्षाचे वकील अॅड. अक्षय नाईक आणि अॅड. प्रदेश रणदिवे यांनी भुते यांचा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला होता. अर्जावर आज शुक्रवारी उत्तर दाखल करण्याचा सरकार पक्षाला आदेश दिला होता. तपास अधिकारी सुधाकर ढाणे यांनी उच्च न्यायालयात व्यस्त असल्याने सरकार पक्षामार्फत उत्तर दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी मागितला. तो न्यायालयाने मंजूर केला. सरकार पक्षातर्फे न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी बाजू मांडली. दरम्यान पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने अॅड. बी. एम. करडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून मूळ रकमेची सहापट रक्कम न्यायालयात जमा करण्याचे भुते यांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली. गुंतवणूकदारांनी गोल्डन योजने अंतर्गत २०११ पासून ही गुंतवणूक केलेली आहे. (प्रतिनिधी)
भुते यांचे कारागृहातील वास्तव्य वाढणार
By admin | Published: January 09, 2016 3:28 AM