मंगेश व्यवहारे
नागपूर : राज्य शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका या कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या काळात आर्थिक बाजू कमकुवत होऊ दिली नाही. उलट त्यांना बक्षीस, अतिरिक्त मानधनाच्या रूपात निधी देऊन प्रोत्साहित केले. दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना शासनाकडून दिली जाणारी भाऊबीज भेट ऐन दिवाळीत देऊन त्यांचा सन्मान केला. कोरोनाच्या काळात सरकारने या घटकांसाठी दाखविलेल्या उदारतेमुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांचे कार्य चालते. नागपूर जिल्ह्यात २,४२३ अंगणवाड्या आहेत. सध्या कोरोनामुळे अंगणवाड्यांतील चिवचिव हरविली असली तरी, सेविका व मदतनीस यांचे कार्य सुरूच आहे. लाभार्थी बालकांना पोषण आहाराच्या माध्यमातून मिळणारे कडधान्य वितरण करीत आहेत. गर्भवती महिलांचे लसीकरण, गृहभेटी हे कार्य सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे. कोरोना काळातही त्यांचे काम थांबलेले नाही. त्यामुळे महिला व बाल विकास मंत्र्यांनी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
एकूण अंगणवाड्या - २,४२३
अंगणवाडी सेविका - २,०९३
मिनी अंगणवाडी सेविका - २५६
मदतनीस - २,०५१
- ऐन दिवाळीच्या दिवशीच सेविकांच्या दिवाळी भाऊबीजेचा निधी विभागाकडे जमा झाला. आम्ही तो सीडीपीओच्या खात्यात टाकला आहे. एक-दोन दिवसात सेविकांच्या खात्यात हा निधी जमा होईल.
भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी
- दरवर्षी आम्हाला भाऊबीज भेट जानेवारीपर्यंत मिळते, यापूर्वी आम्हाला त्यासाठी आंदोलनही करावे लागले आहे. यंदा कोरोनाचे संक्रमण असतानाही सरकारने भाऊबीज भेट दिवाळीच्या पर्वात देऊन, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे समाधान केले आहे.
चंदा मेंढे, जिल्हा सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू)