प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून सेंद्रिय पद्धतीने खाद्य उत्पादने घेण्याकडे उत्पादकांचा व खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात गेल्या काही महिन्यात, विशेषत: कोरोनाच्या काळात गीर गाईच्या दुधाची मागणी प्रचंड वाढली आहे. महिन्याकाठी दीड लाख लिटर दुधाची होणारी खुली विक्री पाहता नागपुरात पारंपरिक दुग्धक्रांतीला प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरील त्रिकोणी प्रदेशातूनही काठियावाडी बेडे देशभरात विखुरलेले आहेत. नागपूर जिल्ह्यातही चहूबाजूंनी २०० हून अधिक हे बेडे आहेत. या प्रत्येक बेड्यात दहा ते बारा कुटुंबे असतात आणि प्रत्येक बेड्यात १५० ते एक हजारावर गीर प्रजातीच्या अर्थात शुद्ध स्वरूपातील देशी गाई आहेत. हे सगळे बेडे मिळून महिन्याकाठी लाखो लिटर दूध घेत असतात आणि मोठमोठ्या ब्रॅण्डसला पुरवठा करत असतात. काही दूध खुल्या स्वरूपातही विकले जाते. नागरिकांकडून या दुधाची खुली मागणी व्हायला लागली. त्यामुळे, महिन्याकाळी काही हजार खुल्या दुधाची विक्री कोरोनाकाळात दीड लाख लिटरपर्यंत वाढली आहे. आता दिवाळीच्या काळात दुधाची मागणी प्रचंड असते आणि तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे या काठियावाडी बेड्यांनी आता स्वत:च कंबर कसली असून, प्रत्यक्ष सेवा देण्याच्या तयारी केली आहे.१०० ते १२० रुपये लिटरने विक्रीसर्वसाधारण पॅकेट्सचे दूध ४८ रुपये लिटरने ग्राहकांना मिळते. गाईचे गोठे सांभाळणारे खुल्या दुधाची विक्री ५० ते ६० रुपये लिटरने करत आहेत. मात्र, गीर प्रजातीच्या गाईंचे होणारे पारंपरिक आरोग्यदायी पोषण बघता आणि दुधातील पौष्टिकता बघता अनेक नागरिक गीर दुधाची मागणी करत आहेत. हे दूध १०० ते १२० रुपये लिटरने विकले जात आहे.देशी गाईचे महत्त्व लोकांना पटायला लागले आहे. त्यामुळेच गीर गाईचे दूध मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. या बेड्यांना संघटित करत सर्वसामान्यांना सर्वसामान्य किमतीत हे आरोग्यदायी दूध मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. आता खऱ्या अर्थाने शहरात दुग्धक्रांती घडत आहे.- मुकुंद अड्येवार - संचालक, गोकुळगंगा पशू व कृषी अनुसंधान केंद्र