मेयो प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश : साधी सोनोग्राफीसुद्धा केली नाहीनागपूर : ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर गिरडकर यांच्या मूत्राशयाला (ब्लॅडर) इजा होऊन अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे १२.२० मिनिटांनी गिरडकर यांना मेयो रुग्णालयात आणले परंतु पहिल्या दोन तासांत योग्य निदानच झालेले नाही. साधी सोनोग्राफीसुद्धा झाली नाही. वेळीच योग्य निदान झाले असते तर कदाचित गिरडकर यांचे प्राण वाचविले जाऊ शकले असते. त्यामुळे नातेवाईक संताप व्यक्त करीत आहे.बुधवारी मध्यरात्री सुमारे १२.१० वाजताच्या सुमारास पंचशील चौकात गिरडकर यांना अपघात झाला. १२ वाजून २० मिनिटांनी त्यांना मेयोत उपचारासाठी आणले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी पहिला एक तास हा ‘गोल्डन अवर’ असतो. या एका तासांत तत्काळ निदान करून आवश्यक वैद्यकीय सोयी उपलब्ध होणे आवश्यक असते. गिरडकर यांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन किमान सोनोग्राफी होणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कॅज्युल्टीमध्ये रात्रीच्यावेळी तीन मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) आणि वरिष्ठ डॉक्टर्स (लेक्चर्स) असतात. परंतु बुधवारी वरिष्ठ डॉक्टर नव्हते. कमी अनुभवामुळे सीएमओ यांना वेळीच निर्णय घेता आले नाही. केवळ पायावरच्या दुखापतीकडेच त्यांनी लक्ष दिले. एक्स-रे आणि गुडघ्यावर टाके लावण्यामध्येच दोन तास गेले. मध्यरात्री २.३५ मिनिटांनी गिरडकर यांची प्रकृती आणखी गंभीर झाली. त्यांना आयसीसीयूमध्ये हलविण्यात आले. तिथे व्हेंटिलेटर लावण्यात आले. पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तज्ज्ञाच्या मते, किमान सोनोग्राफी झाली असती तर अंतर्गत रक्तस्राव कुठे होत आहे याची माहिती मिळाली असती. (प्रतिनिधी)चौकशी समितीत सहा वरिष्ठ अधिकारीमेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांनी या घटनेला गंभीरतेने घेऊन शुक्रवारी चौकशीचे आदेश दिले. या समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. मेहता असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर, डॉ. उईके, डॉ. पी.पी.जोशी, प्रशासकीय अधिकारी बुरेवार व मेट्रन गावंडे आदींचा समावेश आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत या समितीला आपला अहवाल अधिष्ठात्यांकडे सादर करावयाचा आहे.चौकशीत कोण दोषी आहे ते समोर येईलचडॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला किंवा नाही, हे आताच सांगणे कठीण आहे. परंतु या घटनेला घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. चार वरिष्ठ डॉक्टरांसह दोन वरिष्ठ अधिकारी या घटनेची सखोल चौकशी करीत आहे. समितीतून आरोप असलेल्या विभागाला दूर ठेवण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणात कोणी दोषी असेल तर ते समोर येईलच.-डॉ. मधुकर परचंड, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय
मूत्राशयाला इजा झाल्याने गिरडकरांचा मृत्यू!
By admin | Published: January 16, 2016 3:33 AM