आॅनलाईन लोकमतनागपूर : हृदयशस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ‘स्टेन्ट्स’च्या किमती जरी कमी झाल्या असल्या तरी इतर शुल्कांचे नाव देऊन काही इस्पितळांकडून रुग्णांची लुबाडणूकच सुरू असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. मात्र या नफेखोरीला राज्य शासनाकडून चाप बसविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे निर्देशदेखील देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली. बापट यांनी मंगळवारी ‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय विभागासोबत विविध विषयांवर संवाद साधला.इस्पितळांची नफेखोरी बंद व्हावी व सामान्य रुग्णांवर शुल्काचे ओझे पडू नये यासाठी केंद्राकडून ‘स्टेन्ट’प्रमाणे १८ इतर वैद्यकीय उपकरणांचे दर निश्चित करण्यासाठी विचार सुरू आहे. तरीदेखील नफेखोरीसाठी इतर शुल्कांचा मार्ग वापरणाऱ्या इस्पितळांकडे शासनाचे लक्ष आहे. औषधांच्या किमतीवरदेखील अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आता आम्ही यासंदर्भात सर्व प्रक्रिया आॅनलाईन पोर्टलवर आणण्याचा विचार करत आहोत. औषध दुकानांचे व्यवहार येथे नोंदवावे लागतील व सोबतच वैद्यकीयतज्ज्ञांचे ‘प्रिस्क्रिप्शन’देखील जोडावे लागेल. त्यामुळे गैरव्यवहार कमी होतील, असा दावा बापट यांनी केला. काही पेट्रोलपंपावरदेखील ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही पेट्रोलपंप धारकांना ‘आॅडिट’ अनिवार्य केले आहे. कंपनीच्या प्रतिनिधींवरदेखील जबाबदारी निश्चित केली असल्यामुळे उपकरणांत कुठलाही बदल करणे त्यांना शक्य होणार नाही. ही प्रणाली फक्त महाराष्ट्रातच लागू करण्यात आली आहे, अशी माहिती बापट यांनी दिली. ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी बापट यांचे स्वागत केले.सभागृहात मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावीगेल्या काही काळापासून राजकीय प्रणालीतदेखील बदल झाले आहेत. आमदार हे आता आत्मकेंद्रित झाले असून स्वत:च्या मतदारसंघापुरताच विचार करताना दिसून येतात. सभागृहात अनेकदा तर विधेयकांवर सखोल चर्चाच होत नाही. जर मूळ प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली तर अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल, असे गिरीश बापट यांनी सांगितले.विदर्भाशी माझी नाळ जुळलेलीयावेळी बापट यांनी विदर्भाशी असलेल्या संबंधांबाबतदेखील माहिती दिली. आम्ही अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या गावचे असून माझ्या वडिलांचे शिक्षण वगैरे तेथेच झाले. आजदेखील तेथे आमचे नातेवाईक राहतात. विदर्भाबाबत माझ्या मनात विशेष जिव्हाळा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.