- आरपीएफने केले पालकांच्या स्वाधीन
- आरोपी तरुण सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)ने मुंबईत अपहरण झालेल्या मुलीला आरोपी तरुणासह ताब्यात घेऊन, मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. आरोपीला सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक आठवर आरपीएफचे ललित गुर्जर यांना एक १४ वर्षीय मुलगी २० वर्षीय तरुणासोबत भेदरलेल्या अवस्थेत आढळून आली. विचारपूस केल्यानंतर दोघांनाही आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. दाेघांचेही आधार कार्ड तपासण्यात आले. त्याअनुसार तरुणाचे नाव मो. साहीन अन्सारी रा. बिजनौर, उत्तर प्रदेश असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुलीला तिच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक मागितला असता, तिने चुकीचा नंबर दिला. तिची समजूत काढल्यानंतर तिने खरा क्रमांक दिला. त्यावर तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता आपल्या मुलीचे मुंबई येथून अपहरण झाले असून, याबाबत सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आरपीएफ निरीक्षक आर.एल. मीणा यांनी सांताक्रूझ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणोरे यांच्याशी संपर्क साधून ही मुलगी नागपूर स्थानकावर असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर मुलीचे नातेवाईक व सांताक्रूझ पोलीस नागपुरात आरपीएफ ठाण्यात आले. तेथे या दोघांनाही सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.