लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनदेवीनगरच्या अस्थायी पुलावरून पडून एक ११ वर्षांची बालिका पिवळी नदीत वाहून गेली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. नदीत वाहून गेलेल्या बालिकेचा अद्याप शोध लागला नाही. प्रशासनाने बालिकेचा शोध सुरु केला आहे. यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून शोध मोहीम सुरु केली आहे.
सालेहा मुस्कान सलीम अन्सारी (११) असे वाहून गेलेल्या बालिकेचे नाव आहे. पिवळी नदी येथील संगमनगरच्या गल्ली क्रमांक ३ मधील रहिवासी मुस्कान आपली मोठी बहीण आलिया सोबत आपली आई शफिकउन्नीसा यांना भेटण्यासाठी गेली होती. आईकडून पैसे मिळाल्यामुळे दोघी बहिणी खूश होत्या. त्या वनदेवीनगर मुख्य पुलाला लागून असलेल्या लोखंडी पुलावरून घरी परत येत होत्या. सालेहा आपल्या मोठ्या बहिणीच्या मागे चालत होती. दरम्यान चालताना अचानक सालेहाचे संतुलन बिघडले. ती पिवळी नदीत पडली. सालेहा नदीत पडल्याचा आवाज आल्यामुळे आजूबाजूला असलेले नागरिक गोळा झाले. दरम्यान दोघा जणांनी सालेहाला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे त्यांना तिचा शोध लागला नाही. वनदेवीनगर मुख्य पुलाचे काम सुरु असल्यामुळे पाणी अडविण्यात येते. परंतु बुधवारी पाणी थांबविण्याचे साधन हटविण्यात आले. त्यामुळे नदीला अधिक प्रवाह होता. बालिकेचे वडील सलीम अहमद अन्सारी भाजी विक्रेता आहेत. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
पुलाची अवस्था आहे बिकट
पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने बालिकेचा शोध सुरु आहे. बालिका मिळाल्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे. अस्थायी पुलाची अवस्था चांगली नाही. त्यामुळेच बालिका नदीत पडली.
रमाकांत दुर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यशोधरानगर
जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात नागरिक
वांजरा, माजरी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मागील दोन वर्षांपासून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. येथे तयार करण्यात आलेला अस्थायी पुल जीवघेणा ठरत आहे. ज्या पुलावरून बालिका नदीत पडली त्या पुलाच्या दोन्ही बाजुला केवळ सिंगल पाईप लावलेले आहेत. त्यामुळे संतुलन बिघडून नदीत पडण्याचा धोका असतो. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र शासनाच्या महामार्ग निधीतून पिवळी नदीच्या वनदेवीनगर पुलाचे काम सुरु आहे. प्रशासनाने जून २०२० मध्ये हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या पुलाचे काम अपूर्ण आहे.