नागपूर : ‘इन्स्टाग्राम’वर सक्रिय असलेल्या एका तरुणीला वारंवार अश्लिल मॅसेजेस पाठवून तसेच व्हिडीओ कॉल करून त्रास देत विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीने ही छळवणूक सहन न करता थेट पोलिसांकडे धाव घेतली व ‘सायबर’रोमिओविरोधात तक्रार दाखल केली.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २५ वर्षीय तरुणी ही ‘इन्स्टाग्राम’वर बऱ्यापैकी सक्रिय असते. ३१ जानेवारी रोजी तिला नितेश एस.सुपतकर या इन्स्टाग्राम युझरने मॅसेज पाठविला. त्याच्याशी संवाद साधण्यात रस नसल्याने तरुणीने दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर त्याने सातत्याने मॅसेज पाठवून विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मॅसेजेस करू नका असे तरुणीने त्याला सुनावले, मात्र तरीदेखील संबंधित युझरने तिला त्रास देणे सुरुच ठेवले.
यानंतर त्याची हिंमत वाढली व त्याने तरुणीला अश्लिल मॅसेजेस केले व व्हिडीओ कॉलकरूनदेखील त्रास दिला. यादरम्यान त्याने तिचा ‘ऑनलाईन’ विनयभंगदेखील केला. आरोपीची हिंमत जास्तच वाढल्याचे पाहून अखेर तरुणीने पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेतली व संबंधित युझरविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सायबरतज्ज्ञांच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू आहे.