नागपूर ( काटोल) : काटोल येथे 20 दिवसापूर्वी पल्लवी महाजन या तरुणीच्या रेल्वेने कटून मृत्यू झाला होता. या तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच इराणी समुदायातील तरुणांचा वाढता उन्माद व गुंडगिरी रोखण्याची मागणी करणारे पत्रक काढणारे काटोलचे माजी नगराध्यक्ष व शेकाप नेते राहूल देशमुख यांना पोलिसांनी अटक कल्याने काटोल मध्ये नवा वाद उफाळून आला आहे. याप्रकरणी देशमुख समर्थकांनी काटोल बंदची हाक दिली आहे.
देशमुख यांनी काढलेल्या पत्रकात काही आक्षेपहार्य मजकूर असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करून शुक्रवारी सकाळी 6 वाजता अटक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार 4 मे रोजी काटोल शहरातील पल्लवी महाजन या तरुणीचा रेल्वेने कटलेला मृतदेह आढळून आला होता. या तरुणीचे इराणी मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे आणि त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडीलांनी केला होता. यानंतर इरफान अली या तरुणावर पल्लवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र पल्लवीची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा ती तिच्या वडिलांचा आरोप आहे. याप्रकरणी योग्य तपास होत नसल्याने राहुल देशमुख यांनी एक पत्रक काढले होते.
यात देशमुख यांनी गुंड प्रवृत्तीच्या इराणी तरुणांना वठणीवर आणण्याकरिता तसेच ज्यांच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत अशांना तडीपार करण्याची मागणी करणारे पत्रक काढले होते. तसेच कॅन्डल मार्च काढून मृत मुलीला श्रद्धांजली देण्याकरिता परवानगी देण्याची मागणी देशमुख यांनी काटोल पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी तांत्रिक कारणास्तव नाकारली होती.