लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील १२ वर्षीय बालिकेचा करुण अंत झाला, तर तिच्या वडिलांना दुखापत झाली. सोमवारी सकाळी १०च्या सुमारास मानकापूर चौकाजवळ हा भीषण अपघात घडला.
अलंक्रिता महेश नुन्नारे असे मृत बालिकेचे नाव आहे. मानकापूरच्या राणू स्कूलजवळ राहणारे महेश नुन्नारे एका शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना १२ वर्षीय अलंक्रिता तसेच तिच्या पेक्षा छोटी दोन मुलं आहेत. आज सकाळी १० च्या सुमारास महेश नुन्नारे कामाच्या निमित्ताने आपल्या पल्सर दुचाकीवर मुलगी अलंक्रितासोबत जरीपटक्यात जात होते. मानकापूर चौकात मागून वेगात आलेल्या ट्रक (क्र. एमएच ०४ सीजी ४६४३) च्या आरोपी चालकाने नुन्नारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे अलंक्रिता जागीच गतप्राण झाली. तर नुन्नारे किरकोळ जखमी झाले. या अपघातामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच मानकापूरच्या ठाणेदार वैजयंती मांडवधरे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून तेथील गर्दी पांगवली. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
काळाने डाव साधला
सातवीत शिकणारी अलंक्रिता कोरोनाच्या धाकामुळे चार-पाच महिन्यांपासून घरातच होती. आज सकाळी वडील बाहेर जात असल्याचे पाहून तीसुद्धा त्यांच्या मागे लागली. घरात राहून राहून कोंडमारा होत असल्याचे लक्षात आल्यामुळे आपले काम होईल आणि तिला फिरवून आणल्यासारखे होईल, असे वाटल्याने महेश नुन्नारे यांनी अलंक्रिताला सोबत घेतले अन् मध्येच काळाने डाव साधला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.