नागपूर : आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात भरदुपारी कुणीतरी बाहेरचा अज्ञात ईसम येतो आणि असुरक्षित वातावरणाचा फायदा घेऊन तेथील विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो, या घटनेमुळे गणेशनगर, नंदनवन येथील आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहातील वातावरण चांगलेच तापून निघाले. संतप्त झालेल्या दोनशेवर विद्यार्थिनींनी एकत्र येत येथील अपर आदिवासी आयुक्त कार्यालयापुढे रोष व्यक्त करीत रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला.
गुरुवारी एक अनोखळी इसम दुपारी एक वाजताच्या सुमारास नंदनवन येथील वसतिगृहात शिरला. त्याने वसतिगृहातील एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करताच त्याने वसतिगृहातून पळ काढला. हा प्रकार माहीत होताच विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट उसळली. सुरक्षिततेच्या मुद्यावरून मुलींनी थेट शुक्रवारी अपर आदिवासी आयुक्त कार्यालयापुढे ठिय्या दिला. त्या आरोपीला शोधून काढा, आम्हाला सुरक्षितता द्या अशी त्यांची मागणी होती. वसतिगृहात घटनेच्या वेळी वार्डन, गार्ड व स्टाफ उपस्थित नसल्यामुळेच हा प्रकार घडला असा त्यांचा आरोप होता. वसतिगृहातील सीसीटीव्हीही बंद असल्याचा रोषही त्यांनी यावेळी काढला.
एवढी गंभीर घटना घडूनही पीडित विद्यार्थिनीला पोलिसात तक्रार करण्यासाठी वसतिगृहातील वार्डन अथवा प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सहकार्य न केल्याचीही ओरड या विद्यार्थिनींनी यावेळी केली. त्यामुळे वसतिगृहातील वार्डन व इतर जबाबदार कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी रेटून धरली. सायंकाळपर्यंत विद्यार्थिनी ठिय्या देऊन बसल्याने वातावरण तंग झाले होते. अखेर परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, तेव्हा कुठे विद्यार्थिनींनी ठिय्या मागे घेतला. दरम्यान कोतवाली पोलिसांत पीडित मुलीने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनोळखी इसमावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.