लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असलेल्या विद्यार्थिनींच्या सायकलींना सुसाट वेगात जात असलेल्या ट्रकने मागून धडक दिली. त्यात एकीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चौघी गंभीर जखमी झाल्या. ही घटना नागपूर - गडचिरोली मार्गावरील भिवापूर (जिल्हा नागपूर) शहरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रोडवरील काही वाहनांच्या काचा फोडून जाळपोळ केली. शिवाय पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.सुगंधा धनराज पिंपळकर (१७, रा. हिवरा, ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, जखमींमध्ये युवांशी महेश कैकाडे (१७, रा. नक्षी, ता. भिवापूर), ऐश्वर्या बोदिले (१७), दीपाली देवराव नागरीकर (१७, रा. भिवापूर) व धनश्री आरवारे (१७) या चौघींचा समावेश आहे. त्या पाचही जणी भिवापूर येथील राष्टÑीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी (विज्ञान)च्या विद्यार्थिनी आहेत. शनिवारी सकाळची शाळा होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर त्या सायकलवरून घराकडे जायला निघाल्या. त्यांनी नागपूर - गडचिरोली मार्ग ओलांडला आणि डाव्या बाजूने जाऊ लागल्या.त्यातच मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना उडाविले. या अपघातात सुगंधाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य चौघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना लगेच भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टर नसल्याने नागरिक संतप्त झाले. शिवाय, चौघींवर प्रथमोपचार करून नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली. दुसरीकडे, संतप्त नागरिकांनी या मार्गावरील काही वाहनांच्या काचा फोडल्या तर एक ट्रॅव्हल्स पेटविली. शिवाय, जमावाने भिवापूर पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. त्यामुळे भिवापूर शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.
नागपूर जिल्ह्यात ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:41 PM
घरी परत जात असलेल्या विद्यार्थिनींच्या सायकलींना ट्रकने मागून धडक दिली. त्यात एकीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चौघी गंभीर जखमी झाल्या. ही घटना नागपूर - गडचिरोली मार्गावरील भिवापूर शहरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देचौघी गंभीर जखमीभिवापूर शहरात तणावपूर्ण शांतता