जरीपटक्यातील भीम चौकातील अवनी ज्वेलर्सचे संचालक आशिष नावरे यांच्याकडून बंदुकीच्या धाकावर रोख रकमेसह २०.७३ लाखाचे दागिने लुटले होते. पोलिसांनी आठ तासात घटनेचा खुलासा करून आरोपी वीरेंद्रकुमार यादव (२६) रा. माणिकपूर प्रतापगड आणि दीपक त्रिपाठी (२४) अलाहाबाद यांना मध्य प्रदेशातील कटनी येथे अटक केली. घटनेचा सूत्रधार कृष्णा पांडे आणि पिंकू शुक्ला पोलिसांना चकमा देऊन फरार झाले होते. सूत्रधार फरार झाल्यामुळे योजनेची माहिती मिळत नव्हती. पोलीस मंगळवारी सकाळी कृष्णाची गर्लफ्रेंड वंदनाची चौकशी करीत होते. परंतु वंदनाने सुरुवातीला कृष्णा आणि त्याच्या साथीदारांसोबत काहीच संबंध नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तिचा सहभाग असल्याचे पुरावे दिल्यानंतर तिने योजनेची माहिती नसल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी १ जुलै आणि इतर दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना वंदना खोटे बोलत असल्याचे समजले. त्याआधारे त्यांनी आज दुपारी तिला ताब्यात घेतले. सूत्रानुसार कृष्णा आणि वंदना बऱ्याच दिवसापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांनी काही दिवसापूर्वी कोर्ट मॅरेज केल्याची माहिती आहे. कृष्णा नेहमीच वंदनाला भेटण्यासाठी प्रतापगडवरून नागपूरला येतो. त्यांनी १ जुलैला आशिष नावरे आणि इतर चार-पाच दुकानांची रेकी केली. आशिषच्या दुकानात नथ खरेदी केली, तर दुसऱ्या दुकानात चेन दुरुस्त केली. काही वेळ दुकानात थांबून घटनेसाठी सुरक्षित स्थानाची निवड करण्याचा त्यांचा उद्देश होता. कृष्णाला आशिषचे दुकान सॉफ्ट टार्गेट वाटले. दुपारच्या वेळी परिसरात वर्दळ नसते. आशिषचे दुकान सामान्य असल्याचे दिसले. त्यामुळे आशिषच्या दुकानाला पाहून पोलिसांनाही इतके दागिने आणि रोख रक्कम लुटल्यावर विश्वास बसला नाही. आरोपींनी प्रवेश केल्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांना दागिन्यांची माहिती मिळत नव्हती. सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स सूत्रधार कृष्णा पांडेजवळ आहे. त्याला अटक केल्यानंतर सत्यस्थिती पुढे येणार आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ८०० ग्रॅम चांदी, १५ ग्रॅम सोने, दोन बाईक आणि ३८ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
...............
दिशाभूल करण्यासाठी सर्व मार्गाचा अवलंब
कुख्यात आरोपी असल्यामुळे आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी काहीच सुगावा सोडला नाही. ते खोटी नावे घेऊन एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुपट्टा आणि चोरी केलेल्या बाईकच्या नंबरप्लेटवर पट्टी लावलेली होती. घटनेच्या दिवशी ते वेगाने फरार झाले. काही वेळातच त्यांनी टोलनाका ओलांडला होता.
जखमी झाल्याचा घेताहेत फायदा
पोलिसांच्या हाती लागलेले कृष्णाचे साथीदार दीपक त्रिपाठी आणि वीरेंद्र यादव चतूर आहेत. मध्य प्रदेश पोलिसांच्या वाहनाने धडक लागल्यामुळे ते जखमी झाले होते. त्रिपाठीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. वीरेंद्रला न्यायालयात हजर करून १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. चौकशी सुरू करताच तो वेदनेने विव्हळणे सुरू करतो. तो योजनेची माहिती कृष्णाला असल्याचे सांगत आहे. आरोपींचा आपसात वाद झाल्याची पोलिसांना शंका आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त नीलोत्पल आणि गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन चालविण्यात आल्यामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मदतीस तत्परता दाखविली आहे.
..............