नागपूर : प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्यची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ मैल येथे मंगळवारी (दि.२०) रात्री घडली असून, बुधवारी (दि.२१) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आराेपी प्रेयसीसाेबतच तिच्या प्रियकारास अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली.
आझाद जमशेद शेख (२५, रा. वडचिचाेली, ता. पांढुर्ण, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृत पहिल्या प्रियकराचे नाव असून, अटकेतील आराेपींमध्ये ३० वर्षीय प्रेयसीसह तिचा दुसरा प्रियकर दिलीप काशिराम पटले (२८, रा. साेनबा नगर, खडगाव राेड, लावा, वाडी, ता. नागपूर ग्रामीण) या दाेघांचा समावेश आहे.
३० वर्षीय प्रेयसी ही उमरी, ता., जिल्हा रिवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ती १४ मैल, ता. नागपूर (ग्रामीण) येथील सचिन माकाेडे यांच्याकडे कुटुंबीयांसह किरायाने राहायची. आझाद १४ मैल येथील दुकानात काम करीत असल्याने ताे देखील सचिन माकाेडे यांच्याकडेच किरायाने राहायचा. एकाच घरातील वेगवेगळ्या खाेल्यांमध्ये दाेघेही किरायाने राहात असल्याने त्यांची आपसात ओळख झाली आणि पुढे त्या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.
मध्यंतरी ती दिलीप पटलेच्या संपर्कात आल्याने त्या दाेघांचेही प्रेमसंबंध जुळले. याच कारणावरून आझाद व तिचे नेहमी भांडण व्हायचे. ती या भांडणाची माहिती दिलीपला द्यायची. त्या दाेघांनीही आझादला संपविण्याचा कट रचला. दाेघेही मंगळवारी रात्री त्याच्या खाेलीत गेले आणि त्यांनी त्याचा नाॅयलाॅन दाेरीने गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ताे बुधवारी सकाळी बराच वेळ हाेऊनही खाेलीतून बाहेर न आल्याने घरमालकाने त्याच्या खाेलीत झाकून बघितले. ताे मृतावस्थेत आढळून सेताच पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. शिवाय, त्यांनी संशयाच्या बळावर प्रेयसीला ताब्यात घेत विचारपूस केली. तिने गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचे नाव सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी दिलीप पटलेलाही अटक केली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसाांनी आझादचा लहान भाऊ आफताब जमशेद शेख (२०, रा. वडचिचाेली) याच्या तक्रारीवरून भादंवि ३०२ ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास ठाणेदार आसिफराजा शेख करीत आहेत.
भेटण्यास मनाई केल्याने भांडणे
आझाद हा सचिन माकाेडे यांच्या दुकानात दाेन वर्षांपासून काम करायचा. प्रेयसीचे दिलीप पटलेसाेबत सूत जुळल्याचे तसेच दाेघेही वारंवार भेटत असल्याची माहिती आझादला मिळाली हाेती. ताे तिला दिलीपला भेटण्यास मनाई करायचा. तिला ही मनाई मान्य नव्हती. याच कारणावरून दाेघांमध्ये वारंवार भांडणे व्हायची. त्यांच्या प्रेमसंबंध आणि भांडणांची माहिती इतरांनाही हाेती. हीच मनाई आझादच्या मृत्यूस कारणीभूत ठरली.