नागपूर : अनेक दिवसांपासून संपर्कात असलेली मैत्रीण दुरावल्याचे संकेत मिळाल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने तिला अॅसिड हल्ला करून चाकू मारण्याची धमकी दिली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. संबंधित तरुणीने त्याची शनिवारी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.अमित उईके (वय २५, रा. पारडी, कळमना) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो आणि तक्रारदार तरुणी (वय २५) प्रारंभी एकाच भागात शेजारी राहत होते. आता तो कळमन्यात तर ती लकडगंजमध्ये राहते. त्यांच्यात अनेक दिवसांपासून मैत्री होती. अलिकडे काही दिवसांपासून ती टाळत असल्याची भावना झाल्यामुळे अमित तिला वारंवार कॉल करीत होता. ती प्रतिसाद देत नसल्याचे पाहून तिचा वेळोवेळी पाठलाग करणे, फोनवरून शिवीगाळ करणे, असे प्रकार सुरू झाले. त्यामुळे तिने त्याच्यापासून स्वत:ला दूर केले.परिणामी संतप्त झालेल्या अमितने शनिवारी रात्री ८.१० वाजता तरणीला फोन करून चेह-यावर अॅसिड टाकून चाकूने मारण्याची धमकी दिली. त्याचे मनसुबे ध्यानात आल्यामुळे तरुणीने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली अमितविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे.
मैत्रीण दुरावल्याने संतप्त तरुणाची अॅसिड हल्ल्याची धमकी, पोलिसांनी नोंदविला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 2:24 PM