लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घोषित दहावीच्या निकालात विभागात नागपूर जिल्ह्याचा क्रमांक शेवटून दुसरा राहिला. नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची आकडेवारी लक्षात घेतली तर जिल्ह्याचा निकाल ९९.२८ टक्के इतका लागला. गडचिरोली, गोंदिया यासारख्या तुलनेने मागास जिल्ह्यांचा निकाल नागपूरहून चांगला राहिला. दरम्यान, निकालांमध्ये यंदादेखील मुलींचाच दबदबा कायम राहिला. जिल्ह्यातील ९९.३८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
शुक्रवारी दहावीचा निकाल तर घोषित करण्यात आला, मात्र त्यामुळे दिलासा मिळण्याऐवजी विद्यार्थी व पालकांना मनस्तापाचाच सामना करावा लागला. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून ३० हजार ६३७ विद्यार्थिनी मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी झाल्या. त्यातील ३० हजार ४४८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. नियमित विद्यार्थिनींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९० टक्के तर पुनर्परीक्षार्थींमधील विद्यार्थिनींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८३.६० टक्के इतके आहे. जिल्ह्यातून ९९.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ते ४४७ विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत की नाही ?
नागपूर जिल्ह्यात नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून ४४७ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण दाखविण्यात आले आहे. यात ७८ नियमित विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर उरलेले पुनर्परीक्षार्थी आहेत. हे विद्यार्थी खरोखरच अनुत्तीर्ण आहेत की यामागे वेगळे सूत्र आहे यासंदर्भात लोकमतने अधिकाऱ्यांना विचारणा केली असता न झालेल्या संपर्कामुळे हे चित्र असल्याची बाब समोर आली. शाळांकडून मूल्यांकन करताना विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यात आला. मात्र काही जणांशी संपर्क झाला नाही. अशा विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आले. त्यामुळे त्यांची गणना अनुत्तीर्णामध्ये झाली आहे. पुढे शाळांनी त्यांचे निश्चित गुण कळविल्यास मंडळाकडून त्या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर करण्यात येईल.
शाळांमध्ये निरुत्साह, विद्यार्थीदेखील फिरकले नाही
कोरोनामुळे मागील १७ महिन्यापासून विद्यार्थी शाळेकडे फारसे फिरकलेलेच नाही. एरवी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शाळांकडून बोलविण्यात येते व उत्साहाचे वातावरण असते. मात्र यावेळी विद्यार्थी शाळांकडे फिरकलेच नाही व शिक्षकांमध्येदेखील हवा तसा उत्साह नव्हता. शिवाय संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे तर शाळा व विद्यार्थ्यांना निकालच पाहता आले नाही.
जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी
सहभागी-उत्तीर्ण-टक्केवारी
विद्यार्थी -३२,०१०- ३१७५२ - ९९.१९
विद्यार्थिनी- ३०,६३७-३०,४४८- ९९.३८
एकूण- ६२,६४७-६२,२०० - ९९.२८