नागपूर : सायकलने शिवरायांचे रायगड गाठण्यासाठी नागपूरहून पाच मुली व पाच मुले रवाना झाली आहेत. या मुली १,००० किमीचा प्रवास करून रायगड गाठणार आहेत. शहरातील धाडस ग्रुपच्या मुलींनी पहिल्यांदा हे माेठे धाडस स्वीकारले आहे.
शनिवारी सकाळी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुला-मुलींचे पथक रायगडकडे रवाना झाले. या माेहिमेत वर्षा घाटोळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे या मुलींसह सुमित शरणागत, अविनाश कटरे, शुभम मुंडले, निशांत निंदेकर, अनिरुद्ध सोलट यांचा सहभाग आहे. स्त्री सशक्तीकरण, शिवरायांवरील स्वामिनिष्ठा व जीवन कार्याचा प्रसार, सायकलिंगला प्रोत्साहन, गडकिल्ल्याबद्दल जनजागृती, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा हा संदेश देण्यासाठी सायकल मोहीम आरंभल्याचे या टीमने सांगितले. माध्यम लाेकसेवा प्रतिष्ठानने त्यांच्या माेहिमेला सहकार्य केले.
माेहीम आरंभप्रसंगी आमदार माेहन मते, श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या नीरजाताई पाटील यांच्यासह संयोजक दत्ता शिर्के, दिलीप दिवटे, महेश महाडिक, जय आसकर, विनोद गुप्ता, पंकज धुर्वे, मोहीत येडे, प्रज्ज्वल काळे, देवेंद्र घारपेनडे, वेदांत नाथे आदींच्या उपस्थितीत भगवा ध्वज दाखवून सायकल पथकाला रवाना करण्यात आले.