नागपूर : शरीरसंबंधाकरिता पीडित अल्पवयीन मुलीनेच पुढाकार घेतला होता, यासह विविध बाबी लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रियकर आरोपीला जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.
अल्पवयीन मुलीने शरीर संबंधास दिलेल्या सहमतीला महत्व नाही. परंतु, संबंधित घटना कोणत्या परिस्थितीत घडली हे पाहणे आवश्यक आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या व्हॉट्स ॲप चॅटवरून सर्वप्रथम मुलीनेच आरोपीला शरीरसुखाची मागणी केल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोपीने वासनेतून नाही तर, प्रेमाच्या मधुर संबंधातून मुलीसोबत जवळीक साधली, हे स्पष्ट होते. याशिवाय, प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपीविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल केला गेला आहे. करिता, आरोपीला कारागृहात ठेवण्याची गरज नाही, असे हा निर्णय देताना नमूद करण्यात आले.
अक्षय समाधान सिरसाट, असे आरोपीचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील नारेगाव, ता. कारंजा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध धानज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला ३ मार्च २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. प्रेमसंबंध असल्यामुळे त्याने व पीडित मुलीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पहिल्या संबंधाच्या वेळी पीडित मुलगी १३ वर्षे वयाची होती. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलीच्या आईला ती आरोपीसोबत बोलताना दिसली. दरम्यान, सखोल विचारपूस केली असता मुलीने आरोपीसोबतच्या संबंधाची माहिती दिली. परिणामी, पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. आरोपीच्या वतीने ॲड. मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.