मुलींच्या ४५० क्षमतेच्या वसतिगृहांना मंजुरी : नव्या सत्रात प्रवेश मिळतीलनागपूर : एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मुली शहरात धाव घेताहेत. वसतिगृहाच्या अपुऱ्या क्षमतेमुळे शेकडो मुलींना दरवर्षी वेटिंगमध्ये राहावे लागत होते. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या मुलींची हेळसांड थांबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने राज्य सरकारने मुलींसाठी विभागीयस्तरावरील ७, जिल्हा व तालुकास्तरावर ४३ वसतिगृहांना मान्यता दिली आहे. यात नागपूरला २५० क्षमतेचे विभागीय आणि जिल्हा व तालुकास्तरीय १०० क्षमतेचे दोन वसतिगृह मिळाले आहे. त्यामुळे नागपुरात मुलींच्या वसतिगृहाची क्षमता एक हजाराच्या जवळपास झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थिनीला हक्काचा निवारा मिळणार आहे. उत्तरोत्तर होणारा शिक्षणाचा प्रसार व शिक्षणाची जागृती लक्षात घेता मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागात घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची शहराकडे धाव असते. पुणे, मुंबईला ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांचे नागपूरकडे आकर्षण वाढले आहे. नागपूर विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याबरोबरच संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी नागपुरात येत आहेत. विद्यार्थिनींचीही संख्या यात मोठी आहे. शहरात समाज कल्याणच्या मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी चार वसतिगृह आहेत. त्याची क्षमता ५३० विद्यार्थ्यांची आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थिनींना वेटिंगमध्ये राहावे लागत होते. आता समाज कल्याण विभागाने तीन वसतिगृहांना मंजुरी दिल्याने जवळपास १००० विद्यार्थिनींच्या निवाऱ्याची चिंता मिटली आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहाबरोबरच काम करणाऱ्या महिलांसाठी समाज कल्याणच्या १०० क्षमतेच्या वसतिगृहालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नोकरीसाठी येणाऱ्या महिलांनाही निवारा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
मुलींना समाज कल्याणचे बळ
By admin | Published: February 04, 2016 2:56 AM