आॅनलाईन लोकमतनागपूर : पोलीस हवालदाराच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्याच्या परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यामुळे गिट्टीखदान ठाण्यातील वातावरण गरम झाले आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाढदिवसाचा जल्लोष करणारे गप्पगार झाले आहेत.मंगळवारी २१ नोव्हेंबरच्या रात्रीची ही घटना आहे. या दिवशी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल सुरेश आग्रेकरचे अपहरण करून आरोपींनी त्याला जिवंत जाळले. अपहरण आणि निर्घृण हत्याकांडाच्या या घटनेची माहिती मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात कळली होती. त्याचमुळे लकडगंज पोलीस आणि गुन्हे शाखेची सर्वच्या सर्व पथके, वरिष्ठ अधिकारी आरोपींचा शोध घेत धावपळ करीत होते. अनेक वरिष्ठ अधिकारी या अपहरण आणि हत्याकांडामुळे हादरले होते. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या बाजूला असलेल्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या परिसरात आनंदोत्सव, जल्लोष सुरू होता. निमित्त होते, युवराज नामक पोलीस हवालदाराच्या वाढदिवसाचे. एखाद्या नेत्याचा वाढदिवस साजरा व्हावा, अशा थाटात गिट्टीखदान ठाण्याच्या परिसरात युवराजच्या वाढदिवसानिमित्त संदल लावण्यात आला होता. फटाके फोडले जात होते. अनेक जण पोलीस खात्याची शिस्त विसरून देहभान हरपून नाचत होते. हा व्हिडीओ दोन दिवसानंतर व्हायरल झाला आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस हा समाजाचा एक महत्त्वाचा आणि जबाबदार घटक आहे. त्याचाही वाढदिवस थाटातच साजरा व्हायला हवा. मात्र, पोलीस दल शिस्तीचे आहे. त्यांच्या वर्तणुकीला काही चौकटी आहेत. त्या चौकटीतच हे सर्व व्हायला पाहिजे. दुसरे म्हणजे, कोणत्या वेळेला काय करायला पाहिजे, याची जाण पोलिसांनी ठेवायलाच हवी. ती जाण न ठेवता पोलीस बेभान होऊन वागत असेल तर तो प्रकार नक्कीच निषेधार्ह आहे. गिट्टीखदान ठाण्यात २१ नोव्हेंबरच्या रात्री वाढदिवसाच्या निमित्ताने घालण्यात आलेला गोंधळही निषेधार्हच आहे. शहरात एकीकडे खुनाची मालिकाच सुरू झाली आहे. अन्य गंभीर गुन्हेही थांबायला तयार नाही. गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. त्यांना आवरण्याऐवजी पोलीस भलत्याच कामात मश्गुल झालेले आहेत.शहरातील एका टोकावरील पोलीस अपहरण आणि हत्याकांडाच्या घटनेमुळे सुन्न पडले असताना दुसऱ्या टोकावरील पोलीस फटाके फोडून, संदल वाजवून जल्लोष करीत होते. गिट्टीखदान आणि लकडगंज पोलीस ठाण्यातील हा ‘कहीं खुशी, कहीं गम’ चा प्रकार समाजमन अस्वस्थ करणारा ठरला आहे.पोलीस ठाण्यात झाडाझडतीया प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, शनिवारी दुपारी गिट्टीखदान ठाण्यातील अनेकांचे जाबजबाब नोंदवले. रात्री पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यादेखील ठाण्यात पोहचल्या. त्यांनी त्या दिवशी कुणाकुणाची ड्युटी होती, त्याबाबत विचारणा केली. त्यामुळे संबंधित कर्मचारी-अधिकाºयांना थंडीत घाम फुटावा, तसे झाले आहे. दरम्यान, आमची चौकशी सुरू असून, सोमवारपर्यंत या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे सोपविण्यात येणार असल्याचे त्या लोकमतशी बोलताना म्हणाल्या.
हवालदाराच्या वाढदिवसामुळे नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याला फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 10:53 PM
पोलीस हवालदाराच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्याच्या परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यामुळे गिट्टीखदान ठाण्यातील वातावरण गरम झाले आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाढदिवसाचा जल्लोष करणारे गप्पगार झाले आहेत.
ठळक मुद्देपोलीस ठाण्यातील वातावरण गरम : अनेकांचे जबाब नोंदवले