ग्राहक मंचचा सहकारी बँकेला आदेशनागपूर : केवळ निष्काळजीपणा करून एका ग्राहक महिलेस मनस्ताप दिल्यावरून देवनगर येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या महिलेला नुकसानभरपाई म्हणून २० हजार आणि तक्रारीचा खर्च १० हजार रुपये एक महिन्याच्या आत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष मनोहर चुलबुले, सदस्य मंजुश्री खनके आणि प्रदीप पाटील यांनी दिले. गायत्री दत्त, असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव असून त्या जयप्रकाशनगर येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्रकरण असे की, गत १५ वर्षांपासून त्यांचे देवनगर शाखेच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत खाते आहे. या खात्याचे सर्व व्यवहार स्वत: गायत्री आणि त्यांचे वडील पाहतात. १२ सप्टेंबर २०१२ रोजी गायत्री दत्त यांनी आपल्या वडिलास ५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. ते हा धनादेश वटवण्यासाठी बँकेत गेले असता पुरेशी रक्कम नसल्याचे कारण सांगून त्यांना बँकेतून परत पाठविण्यात आले होते. वास्तविक गायत्री दत्त यांचे खात्यात २ लाख ३० हजार रुपये होते.बँकेने धनादेश नाकारल्याने दत्त यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून कमलकांत मिश्रा नावाच्या व्यक्तीला ७ ते ९ सप्टेंबर २०११ पर्यंत विविध रकमांचे धनादेश मानकापूर शाखेच्या पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून देण्यात आल्याचे त्यांना समजले होते. आपण अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नसल्याचे आणि कोणताही व्यवहार केला नसल्याचे दत्त यांनी बँकेला स्पष्ट केले होते. त्यांच्याकडे असलेले धनादेश आणि मिश्राने वटवलेल्या धनादेशात बराच मोठा फरक होता. चौकशीनंतर दत्त यांना असे समजले होते की, मिश्रा नावाच्या व्यक्तीने व्यवहार करण्यापूर्वी दत्त यांनी नव्या चेकबुकसाठी बँकेला अर्ज केला होता. परंतु चेकबुकच मिळाले नव्हते. हे चेकबुक कुणाला दिले याचा त्यांना थांगपत्ता लागत नव्हता. या प्रश्नाचे उत्तर बँकेकडे नव्हते. पंजाब नॅशनल बँकेकडून आलेल्या धनादेशावरील स्वाक्षरीही या बँकेने तपासली नव्हती. बँकेच्या या हलगर्जीपणामुळे मोठा मनस्ताप झाल्याने दत्त यांनी ग्राहक मंचपुढे धाव घतली होती. मूळ रक्कम आणि मानसिक त्रासासाठी आपणास ७ लाख ३९ हजार ३११ रुपये देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. (प्रतिनिधी)
मनस्तापासाठी ३० हजार रुपये द्या- ग्राहक महिलेस दिलासा :
By admin | Published: June 19, 2015 2:35 AM