नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून संकलित करण्यात आलेला सशस्त्र सेना ध्वज दिन निधीचा २००० ते २०१४ चा हिशेब द्या, असे पत्र जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार यांच्याकडे मागितला आहे. ही रक्कम ७ लाख ३४ हजार १८ रुपयांची आहे. स्थानिय निधी लेखापरीक्षणाकडून यासंदर्भात आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हे प्रकरण शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्या काळातील नाही. त्यांनी पदभार सांभाळून वर्ष होत आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे पत्रात स्पष्ट केले आहे की, हा निधी जिल्हा सैनिक कार्यालयास पोहोचता करण्यास विलंब झाल्याने, या रकमेचा गैरवापर झालेला नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास सादर करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलित करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाला टार्गेट देते. संबंधित विभागप्रमुख निधी संकलित करून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सैनिक कल्याण कार्यालयाला सुपुर्द केला जातो. परंतु, २००० पासून २०१४ पर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयाने संकलित केलेला ध्वजनिधी अथवा साहित्य जमाच केले नसल्यामुळे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी हे पत्र पाठविले आहे