लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उदासीनता पाहता बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनाच साकडे घातले आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी निवेदन सादर केले.
कोरोनामुळे बीएडच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यापीठाने बीएडच्या तृतीय सत्राचे निकाल घोषित केले. मात्र चौथ्या सत्राच्या परीक्षेच्या आयोजनावर विद्यापीठाने मौन साधले आहे. शिक्षक भरतीमध्ये टीईटीत पात्र ठरणाऱ्यांनाच संधी मिळणार आहे. बीएडच्या वर्तमान विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेपासून ते वंचित राहतील. या मुद्यावरून विद्यार्थी एकत्र आले असून, विदर्भ स्टुडंट्स अॅन्ड युथ असोसिएशन अशी संघटना उभी केली आहे. टीईटीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख २५ ऑगस्ट आहे. त्याअगोदर सरकार व विद्यापीठाने निर्णय घ्यावा. अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.