नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव पारित केला. हा प्रस्ताव राज्यपालांमार्फत केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे. यासोबतच एखाद्या व्यक्तीला भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची शिफारस करणारे विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांना डी. लिट देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर दीड तास चर्चा झाली. चर्चेदरम्यान कुलगुरूडॉ. सिद्धार्थ काणे म्हणाले, दोन्ही महापुरुषांची उंची डी. लिटपेक्षा मोठी आहे. कुलगुरु म्हणून या महापुरुषांना डी. लिट देण्याची माझी क्षमता नाही. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यपालांचे प्रतिनिधी डॉ. संजय खडक्कार यांनी प्रस्तावात सुधारणा करण्याची सूचना केली. यात दोन्ही महापुरुषांना डी. लिट ऐवजी भारतरत्न देण्याच्या मागणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. आता हा प्रस्ताव राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव त्वरित राष्ट्रपती भवन आणि केंद्र शासनाकडे पाठविण्याची विनंती त्यांना करण्यात येणार आहे. बैठकीनंतर कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी या बातमीची पुष्टी करून लवकरच हा प्रस्ताव राजभवनाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
तुकडोजी महाराज व गाडगेबाबांना भारतरत्न द्या
By admin | Published: April 19, 2015 2:18 AM