राष्ट्रवादीला दे धक्का ! काँग्रेसच्या रश्मी बर्वे अध्यक्ष अन् कुंभारे उपाध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 06:23 PM2020-01-18T18:23:26+5:302020-01-18T18:23:52+5:30
नागपूर जि.प. निवडणुकीत राष्ट्रवादीला दे धक्का
नागपूर : नागपूरजिल्हा परिषदेत मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची अध्यक्ष तर मनोहर कुंभारे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीची सभापदी पदावर बोळवण करून जि.प.वर 1992 नंतर प्रथमच एकहाती सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसच्या धुरणींना यश आले आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात शनिवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात अनुसूचित जाती (महिला) संवर्गासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी टेकाडी सर्कलमधून विजयी झालेल्या काँग्रेसच्या रश्मी श्यामकुमार बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या संवर्गातून एकही उमेवार विजय झाला नसल्याने विरोधी पक्ष भाजपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.
उपाध्यक्षपदासाठी केळवद सर्कल मधून विजयी झालेले काँग्रेसचे मनोहर कुंभारे, रायपूर सर्कलमधून विजयी झालेले राष्ट्रवादीचे दिनेश रमेश बंग आणि पारडसिंगा सर्कलमधून विजयी झालेले चंद्रशेखर कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादी उपाध्यक्ष पदासाठी अखेरच्या क्षणार्पयत आग्रही होती. मात्र शनिवारच्या राजकारणाचे पॉवर सेंटर असलेल्या रविभवन येथून फोन आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी काँग्रेसच्या रश्मी बर्वेआणि मनोहर कुंभारे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर केली.
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल 8 जानेवारी रोजी जाहीर झाला होता. यात काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी काँग्रेस (10), भाजप (15), शिवसेना (1), शेकाप (1) आणि अपक्ष (1) असे उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीची निवडणूक पूर्व आघाडी असल्याने अपक्ष आणि शेकाप मिळून या आघाडीकडे 42 सदस्यांचे संख्याबळ सभागृहात होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माघार घेतल्याने सभागृहात हे संख्याबळ कायम राहीले.
आघाडीत बिघाडी नाही
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढले. या दोन्ही पक्षांना मतदारांनी मोठे यश मिळवून दिले. राष्ट्रवादीला सभापदीपद देण्याचे नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेत काँग्रेसच्या उमेदवारांना पाठींबा जाहीर झाला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली नसल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही
जि.प.अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते सलील देशमुख यांनी नाराजी व्यक्त केलीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर देशमुख यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.