लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना नष्ट करण्यासाठी दिवसरात्र लढत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक आरोग्य संघाद्वारे प्रमाणित सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत, अशा विनंतीसह नागपूरचे डॉ. जेरील बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर केंद्र सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.देशातील अनेक रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रमाणित सुरक्षा साधने पुरविण्यात आली नाहीत. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होत आहे. त्याचा कोरोनाविरुद्धच्या लढ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कोरोना देशावरचे संकट आहे. त्यावर विजय मिळविण्यासाठी सर्वांनी ताकदीने लढणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रमाणित हझमत सूट, स्टेराईल मेडिकल ग्लोव्ह्ज, स्टार्च अपरल्स, मेडिकल मास्क, गॉगल्स, फेस शिल्ड, रिस्पायरेटर्स, एन-९५ मास्क, शू कव्हर्स, हेड कव्हर्स व गाऊन्स पुरविण्याचे सरकारला निर्देश देण्यात यावेत, असे बनाईत यांचे म्हणणे आहे. लहान शहरांमध्ये कोरोना निदान केंद्रे उभारण्यात यावीत. कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी जारी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रमाणित सुरक्षा साधने द्या : सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:40 PM
कोरोना नष्ट करण्यासाठी दिवसरात्र लढत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक आरोग्य संघाद्वारे प्रमाणित सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत, अशा विनंतीसह नागपूरचे डॉ. जेरील बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
ठळक मुद्देजेरील बनाईत यांची याचिका