ओबीसी महासंघाच्या बैठकीत ठराव : ७ आॅगस्टला दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर : राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कर्जाचा डोंगर त्यांच्यावर आहे. बियाणे, खते, अवजारे यांच्या किमती वाढलेल्या असताना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही. मुलांचे लग्न, शिक्षण, कर्ज यात गुरफटलेला शेतकरी आत्महत्येकडे वळला आहे. एकीकडे उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार सबसिडी देत आहे. मात्र अन्नदात्याला जिवंत ठेवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाही. रविवारी पार पडलेल्या ओबीसी महासंघाच्या बैठकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, असा ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास महासंघ रस्त्यावर उतरणार असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय संयोजक बबनराव तायवाडे यांनी सांगितले. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेत धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. बैठकीला माजी खासदार खुशाल बोपचे, अशोक जीवतोडे, सुषमा भड, प्रवीण गायकवाड, सचिन राजूरकर, शरद वानखडे, विनोद उल्लीपवार, अवंतिका लेकुरवाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत खासदार सीताराम येचुरी यांच्या व्याख्यानाला विद्यापीठाने नाकार दिल्याने बैठकीत कुलगुरूंच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. येणाऱ्या ७ आॅगस्टला महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. हिवाळी अधिवेशनावर महासंघाने काढलेल्या मोर्चामुळे सरकारवर दबाव निर्माण होऊन ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून त्यात २,३८४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता ओबीसी आयोग लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यासाठी महासंघाची व्याप्ती राष्ट्रीयस्तरावर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन तायवाडे यांनी केले. त्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये संघटनेची बांधणी करणे, गावागावात महासंघाचे पदाधिकारी तयार करणे, वकील, सरकारी कर्मचारी यांना संघटनेशी जुळवून घेणे. मेळावे, अधिवेशन, बैठकांचे सातत्याने आयोजन करणे आदींवर जास्तीत जास्त भर देण्याचे बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या
By admin | Published: March 20, 2017 2:03 AM