सरकार पक्षाची मागणी : डॉ. प्रशांत नाकाडे हत्याकांड खटलानागपूर : न्यायालयाने २९ डिसेंबर रोजी आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्याचे जाहीर करून आज शिक्षेवर सुनावणी ठेवली होती. सरकार पक्षाकडून शिक्षेवर युक्तिवाद करताना असे सांगण्यात आले की, आरोपी हा सुशिक्षित आणि पेशाने डॉक्टर आहे. न्यायालयासमोर त्याला केलेल्या कृत्याची खंत वाटत नाही. त्यामुळे तो भविष्यात सुधारेल, असे वाटत नाही. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता प्रत्येक गुन्ह्यांचे स्वरूप पाहून योग्य शिक्षा देणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे.कोणत्याही प्रकरणात तथ्यांच्या आधारावर शिक्षा देण्यात यावी. आरोपी हा खून केल्यानंतर आपल्या हातातील रिव्हॉल्व्हर उंचावून इतर लोकांना भीती दाखवीत होता. याचा अर्थच असा की, मृताच्या मदतीला कोणीही धावून येऊ नये. आरोपीने गोळ्या झाडल्या तेव्हा मृत प्रशांत नाकाडे आपल्या वाहनात बसून होते, नि:शस्त्र होते. पळून जाऊन स्वत:चा बचाव करण्याच्या स्थितीत नव्हते. ही बाब या प्रकरणातील अपवादात्मक अपवाद आहे, असे गृहीत धरून आरोपीला मृत्युदंड सुनावण्यात यावा, असाही युक्तीवाद करण्यात आला. बचाव पक्षाच्यावतीने न्यायालयाला दया याचना करण्यात आली. असा घडला होता थरार प्रशांत नाकाडे हे आपल्या कुटुंबाला घेऊन १२ फेब्रुवारी २०११ रोजी कळमन्याच्या महाकाळकर सभागृह येथे लग्नासाठी आले होते. लीना कापगते आणि हिमांशू काशीवार यांच्या लग्नाचा हा समारंभ होता. लग्न समारंभानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास प्रशांत यांचा काका भय्या नाकाडे यांच्यासोबत कापगते यांनी भांडण केले होते. ‘माझ्या पत्नीला तुम्ही पाठवत नाही. त्यामुळे तुला आणि प्रशांतला जिवे मारून मी जेल भोगत बसेल’, अशी धमकी कापगते याने दिली होती. दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास प्रशांत नाकाडे हे आपली पत्नी आशाताई आणि इतर नातेवाईकांना आपल्या ट्रॅक्समध्ये बसवून गावाकडे परत जाण्यासाठी निघाले होते. ट्रॅक्स नाकाडे यांचा ड्रायव्हर चालवीत होता. त्याच्या शेजारी प्रशांत नाकाडे बसलेले होते. त्याच वेळी कापगते हा सरळ प्रशांतच्या दिशेने आला आपल्या रिव्हॉल्व्हरमधून त्याने नाकाडे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. डॉ. प्रशांत नाकाडे यांच्या पोटावर आणि बरगड्यांवर गोळ्या झाडल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. आशाताई प्रशांत नाकाडे यांच्या तक्रारीवरून कळमाना पोलिसांनी राजेंद्र कापगतेविरुद्ध भादंविच्या ३०२ आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. पोलीस निरीक्षक अनिल चौधरी यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षानेही दोन साक्षीदार तपासले होते. हत्याकांडाच्या दहा महिन्यापूर्वी नीता कापगते हिला तिच्याच एका भाच्याने एसएमएसद्वारे ‘शायरी’ पाठविली होती. नीताने ती आपल्या पतीला ‘फॉरवर्ड’ केली होती. या एसएसएसमुळे राजेंद्र कापगते याच्या डोक्यात शंकेचे भूत संचारले होते. त्याने नीताला अमानवीयरीत्या मारहाण केली होती. याहीपूर्वी तो नीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा. होणाऱ्या छळाबाबत नीताने आपल्या भावाला सांगितले होते. एक दिवस कापगते घरी नसल्याची संधी साधून प्रशांतने आपली बहीण नीता हिला सोबत नेले होते. तेव्हापासून ती माहेरीच राहत होती. प्रशांतमुळेच आपली पत्नी आपल्यापासून वेगळी राहते. ती सासरी नांदायला परत येत नाही, असा समज कापगतेचा झाला होता. (प्रतिनिधी)
कापगतेला फाशीच द्या
By admin | Published: December 31, 2014 1:04 AM