लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.नागपूर जिल्हा बार असोसिएशन आणि अॅड. एम. आर. डागा स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायमंदिरातील न्यायाधीश सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश विलास डोंगरे, वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे उपस्थित होते.न्या. गवई म्हणाले की अॅड. एम. आर. डागा राज्यातील ख्यातनाम फौजदारी वकील होते. सेशन कोर्ट, हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्टात काम करण्याची त्यांची वेगळी कार्यशैली होती. बचाव पक्षाची मुद्देसूद बाजू मांडत होते. ही त्यांच्यातील कला वकिलांना मार्गदर्शन ठरणारी आहे. बचाव पक्षाची बाजू त्यांनी अनेकदा नि:शुल्क लढली. सेशन कोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी काही प्रकरणे नि:शुल्क लढविली. न्यायालयात आपली बाजू मांडताना ते कधी चढ्या आवाजाने बोलत नव्हते. त्यांनी आपली बाजू नेहमी नम्रपणे मांडली होती. ते वयाने मला वडिलधारे होते. ज्यावेळी मी सरकारी वकील होतो, त्यावेळी गोेंदिया येथे एका खून प्रकरणाच्या ट्रायलमध्ये ते बचाव पक्षाकडून तर मी सरकारतर्फे बाजू मांडत होतो. बहुदा दोन्ही वकील कोर्ट रूममध्ये प्रकरणात एकमेकांच्या विरोधात असतात आणि कोर्ट रूमबाहेरही विरोधात असतात. परंतु गोंदिया येथे सुनावणीनंतर त्यांनी मला आवाज दिला आणि मित्रासारखे बोलले. त्यांच्यात वैरभाव आणि शत्रुत्वाची भावना नव्हती. ते मित्रत्वाने नेहमी वागले. वकिलापेक्षा ते एक चांगले व्यक्ती होते. ते स्वत: इन्स्टिट्युशन होते. असे गुण फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या स्मरणार्थ वकिलांसाठी विविध कार्यक्रम जिल्हा बार असोसिएनशन आणि समितीतर्फे राबविण्यात येणार आहे, ही आनंदाची बाब आहे.अॅड. प्रकाश जयस्वाल आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, कारागृहातून साध्या पोस्ट कार्डवर अॅड. एम. आर. डागा यांना पत्र मिळाले तरी ते त्यांच्यासाठी न्यायालयात बाजू मांडत होते. कारागृहात त्यांना देव मानले जात होते.याप्रसंगी न्या. प्रसन्ना वराळे, न्या. सुनील शुक्रे, न्या. विनय देशपांडे, न्या. रोहित देव तसेच हायकोटर्चिे मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांच्यासह मोठ्या प्रमाणात वकील वर्ग उपस्थित होता. संचालन अॅड. राधिका बजाज यांनी केले. आभार अॅड. राजेंद्र डागा यांनी मानले.
वकिली व्यवसायाला सेवाभावी वृत्तीची जोड द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:04 PM
कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
ठळक मुद्देन्या. भूषण गवई : वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन