नागपूर : गड्डीगोदाममधील विम्स रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांवर पैशासाठी दबाव आणल्याचा आरोप सदर पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. रुग्णालयाविरोधात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली आहे.
तक्रारीनुसार, मानकापूर येथील सैयद साजिद याला अशक्तपणा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २७ मार्चला रुग्णालयात दाखल केले होते. याच रात्री त्याचे ब्रेन हॅमरेजचे ऑपरेशन झाले. दुसऱ्या दिवशी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, आता ते व्हेंटिलेटरवर नाहीत. मात्र १३ एप्रिलला रुग्णालयातील एका डॉक्टरने नातेवाईकांना बोलावून एक लाख रुपयांची मागणी केली, अन्यथा व्हेंटिलेटर काढून टाकू अशी धमकी दिली. या कुटुंबाने आतापर्यंत उपचारावर सव्वापाच लाख रुपयांचा खर्च केला आहे. रक्कम जमा करण्यासाठी दबाव वाढत असल्याने कुटुंबातील सदस्यांनी रुग्णाला स्पर्श करून पाहिला. मात्र तो कसलीही हालचाल करीत नव्हता. यानंतर एका कर्मचाऱ्याने कुटुंबीयांना एका कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला.
यानंतर कुटुंबीयांनी आपले परिचित असलेले जीशान सिद्दीकी यांना या संदर्भात कल्पना दिली. त्यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली. वाद वाढत असल्याचे पाहून डॉक्टरांनी रुग्णाला पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवले.
तक्रारीमध्ये कुटुंबीयांनी म्हटले आहे की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने दोन दिवसात व्हेंटिलेटर मिळेल, असे आश्वासन दिले आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध होताच ते रुग्णाला घेऊन जातील. मात्र यापूर्वी बाहेरील डॉक्टरला बोलावून आपला रुग्ण जीवित आहे किंवा नाही हे तपासले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.