नागपूर : हुंडा घेऊन लग्न करणे, ही समाजातील विकृत प्रथा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. या विकृतीमुळे आतापर्यंत लाखाे विवाहितांना मरणयातना सहन कराव्या लागल्या आहेत व आजही अनेक महिला या कुप्रथेला बळी पडत आहेत. या काळात ही कुप्रथा चालणे ही शाेकांतिकाच आहे. पण, ही सत्य परिस्थिती आहे. ग्रामीण भागातच नाही तर शहरातही ही प्रथा सर्रास सुरू आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून हुंड्यासाठी हाेणाऱ्या छळाच्या गुन्ह्यांची आकडेवारी कमी दिसत असली तरी भीती व सामाजिक बंधनामुळे महिला पुढे येत नाहीत, हे सत्यही नाकारता येत नाही.
गेल्या काही वर्षात हुंडाविराेधी गुन्हे दाखल हाेण्यामध्ये घट झाल्याचे दिसून येते. पण, हुंडाप्रथा बंद झाली, असा याचा अर्थ अजिबात नाही. हुंडा मागण्याची पद्धत आता बदलली आहे. वरपक्षाद्वारे पूर्वी वधूपक्षाकडून पैशांची मागणी केली जात हाेती. पण, आता गाडी, बंगला किंवा फ्लॅटची मागणी केली जात असल्याचे दिसते. मध्यम वर्गापासून श्रीमंत वर्गापर्यंतच्या स्तरानुसार हुंड्याचे प्रकार माेडतात. या ऐवजासाठी पुढे छळ झालाही तरी सामाजिक प्रतिष्ठेच्या नावावर तक्रार करायलाही अनेक विवाहिता पुढे येत नाहीत, हे वास्तव आहे.
हुंड्यासाठी छळाचे गुन्हे
२०१८ - ९
२०१९ - ७
२०२० - ५
२०२१ (जुलैपर्यंत) - २
अशिक्षितापासून उच्च शिक्षितांपर्यंत
हुंडाप्रथा जपणाऱ्यांमध्ये साक्षर, निरीक्षर असा भेद नाही. हुंडा मागणी करणारे अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत आहेत आणि गरिबापासून गर्भश्रीमंतांपर्यंत सर्वच आहेत. शहरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मध्यमवर्गीय व श्रीमंत वर्गातील नवरदेवांची संख्या अधिक असणे, हे त्याचेच उदाहरण आहे.
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
पूर्वी हुंड्यामध्ये पैसा किंवा साेन्याच्या दागिन्यांची मागणी केली जायची. आता काळानुसार त्यात बदल झाला आहे. श्रीमंत वर्गाचे लग्न असेल तर चारचाकी गाडी, बंगला किंवा फ्लॅटचीही मागणी केली जाते. वधुपित्याला हनीमून पॅकेजची व्यवस्था करायला लावण्याचा प्रकारही हाेत आहे. मध्यमवर्गीय असेल तर दुचाकी गाडी तर ठरलेलीच असते. शिवाय साेन्याची अंगठी, गाेफ हे पक्के असते.
- मुलींचे माता-पिताही जबाबदार
हुंड्यासाठी अत्याचार सहन करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या रूबिना पटेल यांच्या मते मुलींचे माता-पिताही तेवढेच जबाबदार असतात. क्षमता नसली तरी वरपक्षाची मागणी ते मान्य करतात व ती पूर्ण करण्यासाठी काहीही करतात. जणूकाही मुलगी ही त्यांच्यासाठी ओझे आहे. ९० टक्के प्रकारात मुलीचा छळ हाेऊनही तक्रार करण्यासाठी महिला पुढे येत नाहीत. मुलीचा बळी गेल्यावर धावाधाव केली जाते.
नवी पिढी बदलतेय
अनेक कुप्रथांप्रमाणे हुंडा ही भारतीय समाजाच्या विवाह व्यवस्थेतील किड आहे. हुंडा मागणे, ही विकृत मानसिकता आहे, अशा लाेकांवर कठाेर कारवाई हाेणे गरजेचे आहे.
- राहुल गुढे
हुंडा मागणे, ही कुप्रथा आताही सुरू आहे, हे दुर्दैव आहे. मात्र, मुलींनी ठाम भूमिका घ्यायला हवी. हुंडा मागणाऱ्याला ठाम नकार देण्याची व आई-वडिलांनाही समजावण्याची हिंमत दाखवायला हवी. विवाहानंतर असा प्रकार झाल्यास याविराेधात उभे राहायला हवे.
- माेनाली भाेवते