लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौरांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रभाग क्रमांक २६ मधील विकासकामांच्या आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही बैठकीला उपस्थित नसल्याने तसेच फोनला प्रतिसाद न दिल्याने मनपाच्या जलप्रदाय विभाग अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी मनपा प्रशासनाला दिले.प्रभाग क्रमांक २६(अ)चे नगरसेवक अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या सूचनेनुसार महापौर कक्षात आढावा बैठक घेण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.या बैठकीसंदर्भात श्वेता बॅनर्जी यांना पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतरही त्या उपस्थित झाल्या नाहीत. त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे मेश्राम यांनी महापौरांच्या निदर्शनास आणले. यावर महापौरांनी नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.दोन दिवसात माहिती सादर कराप्रभाग क्रमांक २६ (अ) मधील विकासकामांची तपशीलवार माहिती तसेच याशिवाय भांडेवाडी कंपोस्ट डेपो येथील सुरक्षा भिंत व मागील ३ वर्षात करण्यात आलेली कामे, कंत्राटदाराचे नाव, कामाची किंमत, आर्थिक वर्ष, कोणत्या पदाअंतर्गत काम केले याची संपूर्ण तपशीलवार माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.
आसीनगर झोनचे उपअभियंता पझारे निलंबितमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार मंगळवारी आसीनगर झोनच्या करवसुली विभागाचे उपअभियंता अजय पझारे यांना अनुशासनहीनता प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे.सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त निर्भय जैन यांनी याबाबतचे आदेश जारी केले. कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (अनुशासन व अपील) नियम १९७९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जोपर्यंत निलंबन आदेश लागू राहील तोपर्यंत पझारे यांचे मुख्यालय आसीनगर झोन राहील. कार्यकारी अभियंता यांच्या अनुमतीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच या दरम्यान त्यांना दुसरे खासगी काम करता येणार नाही.