लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित एसटीला एक हजार कोटीचे अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.कोरोनामुळे एसटीत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीच्या बसेस ठप्प झाल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास उशीर होत असून मे महिन्याचे वेतन अद्याप कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांच्यात रोष पसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात एसटीला सार्वजनिक वाहतुक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एक हजार कोटींचे अनुदान द्यावे, मे महिन्याचे वेतन त्वरित द्यावे, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, देशातील इतर राज्याप्रमाणे प्रवासी कर १७.५ टक्के ऐवजी ७ टक्के आकारावा, टोल टॅक्स, मोटार वाहन कर माफ करावा, डिझेलवरील व्हॅट कर माफ करावा, परिवर्तन बस खरेदीसाठी शासनाने आर्थिक साहाय्य करावे, खाजगी कंत्राटे रद्द करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)चे प्रादेशिक सचिव अरुण भागवत, विभागीय अध्यक्ष प्रवीण डफळे, विभागीय सचिव सुनील राठोड, विभागीय कार्याध्यक्ष शरद पोयाम, विभागीय कोषाध्यक्ष विनोद चव्हाण, दिलीप रणदिवे, गुणवंत कवडे, दीपक बागेश्वर, प्रवीण बिंड, संजय करडभाजने, शरद साबळे, माधव झोडे यांचा समावेश होता.
एसटीला एक हजार कोटी अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:49 AM