लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साडेसातशे वर्षांची पायीवारीची परंपरा असलेल्या वारीला परवानगी द्या आणि राज्यातील सर्व मंदिर उघडा अशी मागणी करत शनिवारी विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने नागपुरात प्रतीकात्मक दिंडी आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात सुमारे अडीच तास विठ्ठलाची भजने गात वारकऱ्यांनी सरकारकडे आपली मागणी नोंदविली.
या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेसह विश्व वारकरी सेवा संस्था, ज्ञानदेव-तुकाराम प्रतिष्ठान, संत गजानन महाराज समिती, जलाराम सत्संग मंडळ, वैदर्भीय हरिकीर्तन संस्था, अखिल ब्रह्मवृंद संस्था आणि लोकजागृती मोर्चा आदी संस्थांनी आणि संघटनांनी सहभाग घेतला होता.
सद्गुरुदास महाराज, श्रीरामपंत जोशी, नारायण महाराज शिंदे, भागीरथ महाराज, वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेचे शाम धुमकेकर महाराज, गीता अभ्यास मंडळाचे रमेश महाराज बनकर, विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप महाराज कोहळे, अखिल ब्रह्मवृंद संस्थेचे दिगंबरबुवा नाईक, लोकजागृती मंचाचे रमणजी सेनाड, भगवत गीता अभ्यास मित्रमंडळाचे संजय पंदीलवार आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. वारकरी आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. दरम्यानच्या काळात विठ्ठलाची पदे आळवीत मृदुंग आणि टाळ निनादात वारकऱ्यांनी अभंग गायले. यामुळे एरवी आंदोलनाने गजबजणारा संविधान चौक आज भक्तिरसाने धुंद झाला होता. याप्रसंगी महाराष्ट्र क्षेत्र विहिपचे विशेष संपर्कप्रमुख अजय निंदलवर, विहिपचे विदर्भ प्रांत मंत्री सनत गुप्ता, उपाध्यक्ष हेमंत जांभेकर, प्रांत मंत्री गोविंद शेंडे, नागपूर शहर मंत्री प्रशांत पिपरे, मुकुंदबुवा देवसर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.