नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीत अद्यापही नेमका निर्णय झाला नसताना भाजपच्या भूमिकेने आता जागावाटपाचा पेच वाढला आहे. रामटेकची जागा भाजपला द्या अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंतीदेखील केली आहे. त्यामुळे आता या जागेवरून वाटपाचे घोडे अडकून राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपने राज्यातील जागा जाहीर केल्यावर रामटेकबाबत पेच कायमच होता. भाजपचे पदाधिकारी याबाबत आग्रही होते. आता प्रदेशाध्यक्षांनी अधिकृत भूमिकाच मांडली आहे. रामटेकची सीट आम्हाल द्यावी अशी आम्ही एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. या मतदारसंघातील ९९ टक्के सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य भाजपचेच आहेत. मागील १० वर्ष शिवसेनेचे खासदार असले तरी भाजपची या मतदारसंघात ताकद वाढली आहे. आमची शिंदे विनंती मान्य करतील असा विश्वास आहे. त्यांनी विनंती मान्य केली तर भाजप लढेल...अन्यथा शिंदे गटाचा उमेदवार तेथून लढेल. मात्र कुणीली लढले तरी ५१ टक्के मते घेऊन महायुतीचा खासदार निवडून येईल, असे बावनकुळे म्हणाले.
मतांच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरेंनी लाचारी पत्करली
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून १८ खासदार विजयी झाले होते. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी तेवढेच खासदार विजयी करून दाखवावे, असे थेट आव्हान बावनकुळे यांनी दिले. मतांच्या राजकारणाकरिता उद्धव ठाकरे यांनी लाचारी पत्करली आहे. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनच्या मांडीला मांडी लावून बसले. हिंदू आणि ओबीसींचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींना ते शरण गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांचे मुंबईतील भाषण म्हणजे हास्यजत्रा होती, असा चिमटा त्यांनी काढला.