नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिले आहे की, आरक्षण हा मागास समाजाचा अधिकार आहे. जनगणना करीत नसल्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिम धर्मातही मागास जाती खूप आहेत. मुळात हा धर्माचा प्रश्न होऊ शकत नाही. मुस्लिम धर्मातील ज्या मागास जाती आहेत त्यांनाही जनगणना करून आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली.
पटोले म्हणाले, छत्तीसगडमध्ये आदिवासी, ओबीसी, एससीमध्येही आरक्षणात वाढ करण्यात आली. महाराष्ट्रातही मुस्लिमांच्या मागास जाती असतील त्यामध्ये आरक्षणाची वाढ करण्यात येईल, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हे सरकार प्रायोजित होऊन घडवत आहे. राज्यातील एक मंत्री एका समूह बरोबर जाऊन चॅलेंज करत असेल तर लक्षात आले पाहिजे की हे सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटवण्याचे काम सुरू आहे, असा थेट आरोपही पटोले यांनी केला.
शेड्युल दहाप्रमाणे सर्वाधिकार माननीय अध्यक्ष यांचे आहेत. मात्र, वेळेच्या बंधनात निर्णय घेणे अपेक्षित होते. सुप्रीम कोर्टाला अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढावे लागले हेच विधिमंडळाच्या व्यवस्थेला कलंक लावण्याचा काम आताचे लोक करतात. सुनील प्रभूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो असे आपल्या साक्षीमध्ये सांगितले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख सुद्धा प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही, या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांचे बाजूने कारवाई होत असेल तर ते फारच चुकीचे आहे. अधिवेशनात आम्ही याची चर्चा करू. अध्यक्षांना अधिकार असतात मात्र ज्याप्रमाणे विधिमंडळाचे कामकाजाला काळीमा लावण्याचे काम होत असेल तर त्यात आम्हाला शांत बसता येणार नाही,आम्ही जाब विचारू, असा इशाराही पटोले यांनी दिला.
संत तुकारामांचा अपमान करणाऱ्यांकडे कसे जाता ?
- संत तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्यांकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी जावे किंवा जावू नये, आमच्यासाठी इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या पैशाचा चुराडा आणि लूट करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भंडारा येथे मुख्यमंत्र्यांनी रोड शो केला. मात्र लोकच नव्हते. त्यांनी काय प्रचार करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या शो नंतर संघटनांनी रस्ता रोको केला, अशी टीकाही त्यांनी केली.
खेळात राजकारण नको
- राहुल गांधी राजस्थानमध्ये भाषण देत असताना तरुणांनी आवाज मारला. सोशल मीडियावर पनौती शब्द प्रचलित झाला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतलेले नाही. भाजप तसे म्हणते आहे. अंतिम सामन्यासाठी भारतीय टीमला राहुल व प्रियांका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. ज्या पद्धतीने खेळात राजकारण तयार करण्याचे काम सुरू झाले आहे, ते योग्य नाही. खेळात राजकारण येऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी भाजप नेत्यांना दिला.