लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दरमहा १५ हजार मानधन द्यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघटनेचा विधानसभेवर भव्य मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व दिपक पालीवाल, महादेव नागरगोजे पाटील यांनी केले.पोलीस पाटील गावातील अतिशय संवेदनशील कामे करतात, २४ तास त्यांना गाव सोडून कुठेही जाता येत नाही. गावात कायदा, सुरक्षितता आणि शांतता राखण्याचे काम त्यांना करावे लागते. गावातील वाद मिटविणे, गाव तंटामुक्त करणे, दंगे, बलात्कार, खुन, बालविवाह, गावातील नदी, नाले तलाव आदी ठिकाणी मृत्यु अशा घटनांची पोलीस ठाण्यात जावून पोलिसांना खबर द्यावी लागते. अनेकदा अपघाताची माहिती देण्यासाठी दुर अंतरावरील पोलीस ठाण्यात स्वखर्चाने जावे लागते. एवढी महत्वाची कामे असताना त्यांना केवळ ३ हजार रुपये मानधन देवून त्यांची थट्टा करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना व विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघटनेच्या वतीने विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चातून केला.सेवानिवृत्ती वेतन द्यावे,पोलीस पाटील पदावर नियुक्ती करताना त्यांच्या वारसांना प्राधान्य द्यावे,हंगामी पोलीस पाटीलांना कायम करावे, वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्ष करावी आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.मोर्चात शेकडो पोलीस पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजर झाले होते. माजी खासदार तथा कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले, आमदार सुधीर पारवे, आमदार डी. एम. रेड्डी यांनी भेट देवून मोर्चाला पाठींबा दर्शविला. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपच्या शासनात अवैध धंदे, खुन, बलात्काराच्या घटना वाढलेल्या असताना पोलीस पाटलांची जबाबदारीही वाढल्याचे सांगून पोलीस पाटलांना १५ हजार रुपये मानधन मिळावे या मागणीला पाठींबा दिला. मोर्चेकऱ्यांच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दुपारी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मोर्चाला भेट दिली. त्यांनी येत्या आठ दिवसात पोलीस पाटील संघटनेची शासनासोबत बैठक बोलावून बैठकीत मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.