मौदा : सरकारच्या योजनांची प्रतिपूर्ती होत नाही. धान उत्पादकांना अद्यापही बोनस मिळाला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळाली नाही. त्यातच बियाणे व खतांच्या किमती वाढल्या आहेत. ही भाववाढ थांबवा नाही, तर एकरी २५ हजार रुपयांची सहयोग योजना किंवा नुकसानभरपाई द्या, अशी मागणी किसान अधिकार मंच व राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मौदा तहसील कार्यालयापुढे शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळात जगाचे अर्थचक्र बिघडले आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना बेभाव माल विकावा लागला. यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले. अद्यापही स्थिती तीच आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असल्याचे मत किसान अधिकार मंचचे संयोजक व राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे विदर्भ संयोजक राम वाडीभस्मे यांनी व्यक्त केले. या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी, अॅड. अशोक यावले, असलम खातमी, शेखर घाटोळे, दिनेश ठाकरे, तुषार किरपान, संभाजी केकतपुरे, मृणाल तिघरे, राजेश राजगिरे, नामदेव ठोंबरे, शैलेश किरपान, सूर्यकांत ढोबळे, विनोद लेनदे, ज्ञानेश्वर वानखेडे, अमोल राजगिरे आदी सहभागी झाले होते.